Satara Zp News: वाठार स्टेशन आरोग्य केंद्राचा नवा अध्याय! रुग्णांना मिळणार तात्काळ उपचार; जिल्हा परिषदेचा ‘मास्टरप्लॅन’ तयार

जि प.उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले ग्वाही
वाठार स्टेशन | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Satara Zp News उत्तर कोरेगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी वाठार स्टेशन येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक सक्षम करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी कणखर ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राजूभैय्या भोसले यांनी दिली. जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी मांडलेल्या रास्त मागणीला प्रतिसाद देत त्यांनी हे आश्वासन दिले. वाठार स्टेशन येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
सोयी-सुविधा आणि ॲम्बुलन्स यंत्रणा अधिक सक्षम करणार
वाठार स्टेशन येथील आरोग्य केंद्रात आयोजित या बैठकीमध्ये आरोग्य केंद्रातील सोयी-सुविधा, ॲम्बुलन्स व्यवस्था, विविध आरोग्य योजना तसेच ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात पिंपोडे बुद्रुक गट तसेच वाठार स्टेशन गणातील अनेक गावे येत असल्याने नागरिकांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आरोग्य केंद्राची यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीची तातडीने दखल घेत आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर पूर्ण मदत केली जाईल, असे राजूभैय्या भोसले यांनी स्पष्ट केले.
आदर्श आरोग्य केंद्र बनवण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील: अमित चव्हाण
आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स व्यवस्था सक्षम करणे, आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाठार स्टेशन आरोग्य केंद्र हे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील आदर्श आरोग्य केंद्र म्हणून नावारूपाला यावे, यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, असा ठाम विश्वास जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी व्यक्त केला.
अधिकारी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या सभेस कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अध्यक्ष भिकूभाऊ भोसले, पंचायत समिती सदस्य वसंतराव भंडारे, तालुका आरोग्य अधिकारी गांधीले सर, वैद्यकीय अधिकारी डॉ. इगोले व डॉ. बेहेरे, आरोग्य विस्तार अधिकारी गुरव विठ्ठल सर, आरोग्य सहाय्यक प्रशांत काळे सर, तसेच आशा सेविका, नर्सवर्ग, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













