Satara News पिंपोडे बुद्रुक जि.प. गटासाठी ११.५० कोटींचा निधी मंजूर

Satara News जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण ‘ऍक्शन मोड’ मध्ये, पाठपुराव्याला यश
रणजित लेंभे/ महाराष्ट्र वन वृत्तसेवा : Satara News ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध करत पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटासाठी तब्बल ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीमुळे विविध विकासकामांना गती मिळणार असून परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निधीतून रस्ते सुधारणा, गावांतर्गत सुविधा, सौरदिवे उभारणी तसेच धार्मिक स्थळांच्या विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निधी मंजुरीसाठी अमित चव्हाण यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. जिजामाता नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विकासकामांना गती मिळाली असली, तरी स्थानिक पातळीवर पुढाकार घेत निधी मंजुरी मिळवून देण्याचे श्रेय अमित चव्हाण यांनाच दिले जात आहे.
या अंतर्गत वाई–वेळे–सोळशी–नांदवळ–सोनके–पिंपोडे बुद्रुक या १८ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी रुपये, तर सोळशी–करंजखोप–सर्कलवाडी–राऊतवाडी–दहीगाव–वाठार स्टेशन मार्गासाठी १ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय विविध ग्राममार्गांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गावांतर्गत रस्त्यांसाठी २ कोटी २३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून पिंपोडे बुद्रुकसह वाघोली, करंजखोप, सोनके आणि नांदवळ या गावांना याचा थेट लाभ होणार आहे. ग्रामीण भागात २६ सौरदिवे बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, मोरबेंद, घिगेवाडी आणि नायगाव येथे नवीन ग्रामपंचायत इमारती उभारण्यात येणार असून सोळशी येथील श्री सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानासाठी ३ कोटी रुपयांचा भक्तनिवास उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
एकूणच, अमित चव्हाण यांच्या पुढाकारामुळे पिंपोडे बुद्रुक जि.प. गटात विकासकामांना वेग आला असून ग्रामीण प्रगतीला नवे बळ मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी या कामांचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.






