
सातारा | विशेष प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. परंपरागत राजकीय बालेकिल्ले उद्ध्वस्त करत भाजपने साताऱ्यात जोरदार मुसंडी मारली असून, अनेक ठिकाणी सत्ताधारी गड कोसळले आहेत. फलटण, वाई, मेढा, रहिमतपूर, मलकापूरसह महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवत जिल्ह्यात आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे.
सातारा नगरपालिकेवर दोन्ही राजेंच्या नेतृत्वाखाली भाजपने गड जिंकला असून अमोल मोहिते हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत याठिकाणी महाविकास आघाडीचा सपशेल पाडाव झाला आहे. तर ९ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांना धक्का देत विजयश्री खेचून आणली आहे. साताऱ्यात कमळ फुलले असल्याने एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असेलला गड पूर्ण भाजपने जिंकला आहे.
फलटण नगरपालिकेचा निकाल हा या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला असून, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप उमेदवारांनी सत्ता हस्तगत केली आहे. नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य जागांवर भाजपने विजय मिळवत फलटणमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. याठिकाणी समशेरसिंह निंबाळकर यांच्या गळयात जनतेने नगराध्यक्षपदाची माळ घातली आहे.
वाई नगरपालिकेत भाजपचे अनिक सावंत यांनी नगराध्यक्षपद पटकावत भाजपची सत्ता प्रस्थापित केली. भाजपाने वारीमध्ये अनपेक्षित मारलेली मुसंडी मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्यासाठी विचार करायला लावणारी आहे.
रहिमतपूर नगरपालिकेत भाजपचे निलेश माने विजयी झाले असून, याठिकाणी २५ वर्ष सत्तेत असलेल्या सुनील माने यांच्या वर्चस्वाला धक्का बसला असून राष्ट्रवादीला नामोहरण करण्यात आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे.
जिल्ह्यातील लक्षवेधी असलेल्या कराड नगरपालिकेत मात्र भाजप करिष्मा दाखवू शकली नाही भाजपच्या जिल्हाध्यक्ष असलेल्या आमदार अतुल भोसले यांच्या होमपीचवर भाजपाची विकेट पडली आहे येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे राजेंद्रसिंह यादव व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील याच्या आघाडीने विजय संपादन केला आहे. राजेंद्रसिंह यादव यांना कराडकरांनी नगराध्यक्ष म्हणून विजयी केले आहे.
कराड शहरालगतच्या मलकापूर नगरपालिकेतही भाजपचे तेजस सावंत यांनी विजय मिळवला आहे. मेढा नगरपंचायतीत भाजप उमेदवाराच्या विजयामुळे ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाचगणी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने कडवी झुंज देत विजय मिळवला असला, तरी संपूर्ण जिल्ह्याच्या निकालांमध्ये भाजपच वरचढ ठरल्याचे चित्र आहे. अजित पवार गटाच्या पाठिंब्याने दिलीप बागडे यांनी पाचगणीत नगराध्यक्षपद जिंकले, तर महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सुनील शिंदे यांनी १४५१ मतांच्या फरकाने विजय मिळवला. म्हसवड नगरपालिकेत देखील मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे बंधूनी विजयाची चढती कमान कायम ठेवत विजय संपादन केला.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनीही किंगमेकरची भूमिका बजावली असून, काही ठिकाणी सत्तास्थापनेसाठी पुढील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मात्र एकूण चित्र पाहता सातारा जिल्ह्यात भाजपने जोरदार कमबॅक करत विरोधकांना मोठा इशारा दिला आहे.
या निकालांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला मोठे बळ दिले असून, विरोधी पक्षांसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. साताऱ्यातील हा निकाल केवळ नगरपालिका निवडणूक न राहता, जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.





