Friendship Get Together: तब्बल ४४ वर्षांनी भेटले शाळेतले सवंगडी ! श्री मुधाईदेवी विद्यामंदिर देऊरच्या १९८२ च्या तुकडीचा ऐतिहासिक स्नेहमेळावा

देऊर | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
Friendship Get Together वयाची चार दशके उलटल्यानंतर बालपणाच्या सोनेरी आठवणींना उजळा देण्यासाठी आणि निखळ मैत्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी देऊर (ता. कोरेगाव) येथील श्री मुधाईदेवी विद्यामंदिर शाळेतील इयत्ता १० वीच्या सन १९८२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४४ वर्षांनी एकत्र येत एक अनोखा इतिहास रचला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर गेलेले हे वर्गमित्र ४४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देऊर येथे आयोजित स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. या स्नेहमेळाव्यात तब्बल ४५ वर्गमित्र उत्साहाने सहभागी झाले होते.
देऊर पंचक्रोशीतील नावाजलेल्या व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती
या ऐतिहासिक Friendship Get Together स्नेहमेळाव्याला देऊर पंचक्रोशीतील दहिगाव, पिंपोडे खुर्द, बिचुकले, अंबवडे, तळिये, आसनगाव, पळशी आणि गुजरवाडी अशा विविध गावांतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. आज हे सर्व मित्र आपापल्या क्षेत्रात भक्कमपणे उभे असून राजकीय, सामाजिक, शेती, विधी, प्रशासन, नोकरी, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात त्यांनी मोठा नावलौकीक मिळवला आहे. विविध पदांवर कार्यरत असणारे हे सर्व मित्र या दिवशी मात्र सर्व पदांचा आणि वयाचा विसर पडून पुन्हा एकदा १९८२ चे शाळकरी विद्यार्थी बनले होते.
शाळेच्या आठवणीत हरवले सर्वजण; गप्पा आणि विचारपूस
Friendship Get Together स्नेहमेळाव्यादरम्यान एकमेकांची विचारपूस करताना, कुटुंबाची माहिती घेताना आणि जुन्या बालपणीच्या खोड्या, शिक्षकांच्या आठवणी तसेच शाळेच्या वर्गातील प्रसंग सांगताना सर्वजण आठवणीत पार हरवून गेले होते. बालपणीची मैत्री हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असल्याचे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाने सर्वांना पुन्हा एकदा तरुणपणीच्या आणि शालेय जीवनातील दिवसांत नेऊन सोडले. हा मेळावा केवळ भेटण्याचा कार्यक्रम न राहता मैत्रीचा आणि आपुलकीचा एक मोठा सोहळा बनला. ४४ वर्षांनी एकत्रित येत वर्ग मित्रांनी मैत्रीची शाळा भरवली. स्नेहभोजनाने पुन्हा एकत्र जेवणाची पंगत केली.
आयोजकांचे नियोजन आणि मित्रांचा उदंड प्रतिसाद
हा अभूतपूर्व स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी देऊर येथील राजेंद्र बळीराम कदम, राजेंद्र बाबुराव कदम, भारत मारुती कदम, विलास बबन राजे, चंद्रकांत कोंडीराम कुंभार, प्रमोद रंगराव कदम, सुनील किसान कदम, सुनील गोवर्धन कदम, विठ्ठल दादासो कदम, संभाजी रंगराव कदम आणि मानसिंग जयसिंग कदम या सर्व मित्रांनी विशेष पुढाकार घेऊन अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या संकल्पनेला सर्व वर्गमित्रांनी उदंड प्रतिसाद दिला. ४४ वर्षांनंतर झालेल्या या पहिल्याच एकत्रित भेटीने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. राजेंद्र बळीराम कदम यांनी सूत्रसंचालन प्रास्ताविक केले. मधुकर चव्हाण, संभाजी पवार, रतनसिंग शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. तर राजेंद्र बाबुराव कदम यांनी सर्वांचे आभार मानले.












