SATARA BIG NEWS: ‘दुष्काळी कोरेगावची ओळख विकासकामांतून बदलणार’ – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंप; विशाल सोळस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश
कोरेगाव/वार्ताहर
SATARA BIG NEWS: कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी उत्तर भागातील प्रत्येक गावात मजबूत रस्ते, मुबलक पाणी आणि विकासाच्या सुविधा पोहोचवून या भागाची दुष्काळी ओळख विकासकामांतून बदलणार आहे. या भागातील नेतृत्व जपण्याची गरज असून, माजी सरपंच विशाल सोळस्कर यांचा भाजपमध्ये प्रवेश हा उत्तर कोरेगावच्या राजकारणातील महत्त्वाचा बदल आहे. त्यांच्या प्रवेशामुळे या भागातील विकासाला निश्चितच वेग मिळेल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
सोळशी (ता. कोरेगाव) येथे गावचे माजी उपसरपंच तथा युवा उद्योजक विशाल सोळस्कर यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सौ. सोनिया गोरे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, हनमंतराव जगदाळे, पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे, सुरेखाताई पाटील, पुणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष शेखर वढणे, माण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपटराव ठोके, अमित भोईटे, विजय चव्हाण, शहाजी भोईटे यांच्यासह उत्तर कोरेगावातील भाजपचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, मंडल अध्यक्ष, ग्रामस्थ, युवक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, उत्तर कोरेगावातील दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी विकासकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. यापूर्वीच्या नेतृत्वाने या भागाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला; मात्र आता परिस्थिती बदलत असून गावोगावी विकासकामे सुरू झाली आहेत. आगामी काळात ही कामे अधिक वेगाने मार्गी लावून प्रत्येक गावाला रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘दुष्काळी कोरेगाव’ अशी ओळख न राहता विकासाचे कोरेगाव अशी ओळख निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, माझ्या वडिलांनी या भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी वसना तसेच पूर्व भागासाठी वांगना या योजनांसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यानंतरच्या काळात योजनांमध्ये बदल झाल्याने अनेक गावांना अपेक्षित पाणी मिळाले नाही. वसना योजनेसाठी पूर्वी ०.९२ टीएमसी पाणी मंजूर होते. त्यानंतर आणखी ०.५२ टीएमसी पाणी वाढवून देण्यात आले. तरीही उपलब्ध पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. याबाबत लवकरच आवश्यक बदल करून उत्तर कोरेगावातील प्रत्येक गावाला पाणी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपमध्ये प्रवेश केलेले विशाल सोळस्कर म्हणाले, सोळशीसह उत्तर कोरेगावच्या विकासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या भागात पर्यायी विकासव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणी हा या भागाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. विकासाचा महामेरू असल्याचे सांगणारे अनेक मंत्री या भागात आले; मात्र पाण्याचा प्रश्न अद्याप कायम आहे. युवकांच्या हाताला पुरेसा रोजगार नाही, तर अनेक गावांमध्ये आजही मजबूत रस्त्यांचा अभाव आहे. त्यामुळे पाणी, रस्ते आणि युवकांसाठी रोजगार या प्रमुख मागण्यांसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, भाजपा फलटण-कोरेगाव तालुकाप्रमुख अमित रनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज सोळस्कर यांनी केले.
विशाल सोळस्कर यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर कोरेगावातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाल्याची चर्चा असून, आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.










