Vittal Temple Deur देऊर येथील पुरातन विठ्ठल मंदिर विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करणार

शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांची देऊर येथील पुरातन विठ्ठल मंदिरास भेट;
कोरेगाव/ महाराष्ट्र वन न्यूज
Vittal Temple Deur कोरेगाव तालुक्यातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या देऊर येथील पुरातन विठ्ठल मंदिराची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक वास्तूचे योग्य जतन व्हावे, यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोरेगाव विभागातील शिवसेना (शिंदे गट) नेते व कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी नुकतीच या मंदिराला भेट देऊन पाहणी केली. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व विकासासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
बाराव्या शतकातील वास्तुकलेचा वारसा अन् दुरवस्था
देऊर येथील हे मंदिर बाराव्या शतकातील दगडी कोरीव वास्तुकलेचा समृद्ध वारसा जपणारे ऐतिहासिक ठिकाण आहे. सन १९८६ मध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मात्र, काळाच्या ओघात सध्या मंदिराचे शिखर, सभामंडप आणि गाभारा यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. शिखराला तडे गेल्यामुळे पावसाचे पाणी थेट गाभाऱ्यात साचत आहे.या समस्येबाबत ग्रामस्थांनी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वहाने यांनी मंदिराची पाहणी केली असून, या पुरातन वास्तूच्या दुरुस्ती आणि संवर्धनासाठी अंदाजे २ ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजाभाऊ बर्गे यांची पाहणी व आश्वासन
मंदिराच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी देऊर ग्रामस्थ आणि माऊली प्रासादिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजाभाऊ बर्गे यांची भेट घेतली होती. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत बर्गे यांनी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी व ग्रामस्थांशी बोलताना राजाभाऊ बर्गे म्हणाले:
“आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे सातत्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. देऊर गावातील या १२ व्या शतकातील पुरातन मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ग्रामस्थ आणि स्थानिक युवक अतिशय प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून शासनाकडून भरीव निधी मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने पाठपुरावा करेन.”
मान्यवरांची उपस्थिती
या पाहणी दौऱ्यावेळी राजाभाऊ बर्गे यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक, पत्रकार नवनाथ पवार, अधिक बर्गे, माऊली प्रासादिक मंडळाचे कार्यकर्ते आणि देऊर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











