Crime News लोणंदमध्ये थरार! ५ वर्षांपासून गुंगारा देणारा ‘डीपी’ चोर उसाच्या शेतातून जेरबंद; पोलिसांचा १ किमी पाठलाग

सातारा: Crime News सातारा जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आणि शेतकऱ्यांची झोप उडवणाऱ्या एका सराईत डीपी (DP) चोराला वाठार आणि लोणंद पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांची आल्याची चाहूल लागताच आरोपीने थेट उसाच्या शेताकडे पोबारा केला मात्र खाकी वर्दीच्या जिद्दीपुढे त्याचे काही चालले नाही. पोलिसांनी तब्बल १ किलोमीटरपर्यंत त्याचा थरारक पाठलाग करून त्याला उसाच्या फडातून जेरबंद केले.
शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा गुन्हेगार गजाआड
सातारा जिल्ह्यात शेतीपंपाचे डीपी आणि तांब्याची वायर चोरी जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेदरम्यान, वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या गुन्हे प्रकटीकरण (DB) पथकाला एक अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती मिळाली. ५ वर्षांपासून पाहिजे असलेला लखन रमेश भोसले, रा. भुरकर वाडी ता. फलटण हा फरार आरोपी लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या गावी लपून राहण्यासाठी आला होता.
१ किलोमीटरचा पाठलाग अन् थरारक शेवट!
माहिती मिळताच सपोनि सुशिल भोसले यांनी वेळ न घालवता लोणंद पोलिसांच्या डीबी टीमशी संपर्क साधला. दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी मिळून आरोपीच्या घराभोवती चक्रव्यूह रचला. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टीम तयार करून गावाला वेढा दिला.
पोलिस आल्याचे समजताच आरोपी लखन रमेश भोसलेने उसाच्या दाट शेतात धूम ठोकली. उसाच्या शेताचा फायदा घेऊन तो पुन्हा निसटणार असे वाटत असतानाच, वाठार आणि लोणंदच्या पोलिसांनी उसाच्या फडातच त्याचा पाठलाग सुरू केला. अंगावर येणारे उसाचे पाचट आणि चिखलाची पर्वा न करता पोलिसांनी तब्बल १ किलोमीटरपर्यंत त्याला पळवले आणि अखेर त्याला चहूबाजूंनी घेरून झडप घातली. अखेर पाच वर्ष पोलिसांना गुंगारा देणारा लखन रमेश भोसले जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
या जांबाज पथकाची कामगिरी
या यशस्वी आणि धडक कारवाईत वाठार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुशिल भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, नितीन भोसले, सपोफौ बुवा सो वाघमारे, पोलीस अंमलदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, सहदेव तुपे, विवेक शिंदे, संदीप गोरे, आनंदराव भोसले, अमोल कर्णे, विठठल काळे, प्रकाश मेळावणे, प्रतिक देशमुख यांचा समावेश होता.
तसेच महिला पोलीस अंमलदार दिपाली गुरव, माधुरी दिक्षीत, आशा देशमुख यांच्यासह लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप आणि त्यांच्या टीमने या कारवाईत अत्यंत चोख भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर गिरी करत आहेत. या कारवाईमुळे साताऱ्यातील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धडकी भरली आहे.











