NCP Shivsena Alliance 2026 : कोरेगावात राष्ट्रवादी-शिवसेना युतीचा फॉर्मुला यशस्वी ; जळगाव विकास सोसायटीवर सर्व १३ जागांवर दणदणीत विजय, विरोधकांचा पूर्णपणे धुव्वा

कोरेगाव (प्रतिनिधी) : NCP Shivsena Alliance 2026, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील भगवानराव जाधव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीने नेत्रदीपक यश संपादन करत विरोधी भाजप पॅनेलचा धुव्वा उडवला. तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेला शिवसेना – राष्ट्रवादी युतीचा फॉर्मुला यशस्वी झाला असून युतीच्या सर्व १३ उमेदवारांनी दोनशेहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवत सोसायटीवरील आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला.
दिवंगत खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे एकनिष्ठ आणि कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले भगवानराव जाधव यांनी अनेक वर्षे या विकास सोसायटीवर प्रभावी नेतृत्व केले होते. त्यांच्या अकाली निधनानंतर शेतकरी सभासदांच्या आग्रहास्तव आणि मागणीनुसार या विकास सोसायटीला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे विशेष लक्ष लागून राहिले होते.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, युवा नेते दयानंद भोसले व कोरेगाव चे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेने एकत्रित पॅनेल उभे केले होते. युवा नेते गौरव भगवानराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाने एकत्रित येत NCP Shivsena Alliance 2026 युती केली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले होते. दोन्ही गटांनी प्रचारात मोठी ताकद लावल्याने निवडणूक चुरशीची झाली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी आर. एस. कर्णवर यांच्या उपस्थितीत शनिवारी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सायंकाळी तेथेच मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना युतीच्या सर्व उमेदवारांनी २०० पेक्षा अधिक मतांचा फरक राखत विजय मिळवला. विरोधी पॅनेलला मात्र नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ :
अभिजीत सतीश जाधव – ४४५ मते,
गौरव भगवानराव जाधव – ४४० मते,
दत्तात्रय दादा जाधव – ४३३ मते,
अमोल व्यंकट भोसले – ४३३ मते,
दत्तात्रय विठोबा जाधव – ४३० मते,
स्वप्निल हणमंत जाधव – ४२७ मते,
ईश्वर दादा पाणबुडे – ४२२ मते,
हणमंतराव मुगुटराव माने – ४१० मते.
महिला राखीव मतदारसंघ :
रुक्मिणी प्रल्हाद वाघ – ४४९ मते,
वनिता गणेश जाधव – ४३५ मते.
अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघ :
मनोज अर्जुन माने – ४६० मते.
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघ :
विष्णू महादेव शिडतुरे – ४५६ मते.
इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघ :
विठ्ठल राजाराम पवार – ४५३ मते.
निकाल जाहीर होताच जळगाव परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. पॅनेलच्या विजयासाठी लोकनियुक्त माजी सरपंच राजेंद्र अर्जुन जाधव, सुरेश रुपचंद जाधव, संजय जाधव, अरुण अंतू जाधव, शिवाजी विनायक जाधव व हणमंत जाधव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी शिवसेनेचे नेते व कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जळगाव येथे भेट देत पॅनेल प्रमुख व विजयी उमेदवारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, एकसळचे युवा नेते किरण भोसले उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबर सहकार क्षेत्रात शिवसेनेचे पदार्पण : प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे
निकालानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर सहकार क्षेत्रातील निवडणुका देखील पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेने या निवडणुकीत भक्कम साथ दिल्यामुळे हे यश मिळाले असून जळगावसह पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानत आहोत, असेही त्यांनी सांगितले.












