Sholay At 50 बॉलिवूडचा सर्वात गाजलेली फिल्म
Sholay At 50 १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२५ रोजी ५० वर्ष पूर्ण करतो. रमेश सिप्पींचं दिग्दर्शन, जय–वीरूची दोस्ती, गब्बरसिंगची भूमिका आणि सलीम-जावेद यांची कथा यामुळे हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर ठरतो.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरहिट आणि क्लासिक चित्रपट शोले १५ ऑगस्ट २०२५ रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती करतो आहे.
१९७५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो.
मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात हा तब्बल साडेपाच वर्षे राहणाऱ्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीवकुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. त्या काळातील गर्दीचे आमी उत्पन्नाचे उच्चांक करणारा हा चित्रपट काळजाला भिडणारा आहे.
शोलेची कहाणी
- जय आणि वीरू – जिगरी दोस्तांची हृदयस्पर्शी कथा
- ठाकूर बलदेवसिंगचा गब्बरसिंगावरील सूड
- गब्बरसिंगची दहशत आणि रामगढातील भीती
- बसंतीची नृत्यकला आणि वीरूचे प्रेम
- जय आणि राधाचे शांत व हळवे नाते
जय आणि वीरू या एकमेकांच्यासाठी जीव देणाऱ्या जिगरी दोस्तांची ही कथा आहे. जय व वीरू अजूनही भुरट्या चोऱ्या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. ज्या दिवशी जेलमधून सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकूर बलदेव सिंग या माजी पोलीस अधिकाऱ्याच्या विनंतीवरून ते रामगड या गावात येतात. ठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.
डाकू गब्बरसिंग हा ठाकुरच्या रामगढ जवळपासच्या गावात दहशतीच्या जोरावर गावकऱ्यांकडून खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात तोडतो. त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकऱ्यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत.
गब्बरसिंगाच्या टोळीत कालिया, सांभा यांसारखे डाकू होते जे त्या परिसरात धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी देणार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी जय आणि विरू आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरूच्या पराक्रमामुळे कालियाला रिकाम्या हाताने परतावे लागते.
रिकाम्या हातांनी कालिया परतल्याने गब्बरसिंग चिडतो आणि शिक्षा म्हणून कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनलेला आहे. त्यानंतर गब्बरसिंग स्वतः डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करतो. गब्बरसिंगाचे डाकू व जय-वीरू यांच्यामध्ये जोरदार चकमक झडते. गब्बरसिंग बसंतीला ओलीस ठेवतो. जय स्वतःहून गब्बरसिंगापुढे झुकून गब्बरसिंगाच्या डोळ्यांत धूळ टाकून पारडे आपल्या बाजूस वळवतो व दोघे गब्बरसिंगाला पळवून लावतात. परंतु या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकुरावर चिडतो. तेव्हा ठाकुर गब्बरसिंगाने आपले हात छाटल्याचे उघड करतो.
दरम्यान जय व वीरू हे गावकऱ्यांचे तारणहार होतात. वीरूला बसंतीबद्दल प्रेम होते. वीरूची सोयरीक घेऊन जय मावशीशी बोलणी करतो. हा प्रसंग मोठा मजेशीर आहे. पण मावशी कोणत्याही परिस्थितीत यासाठी तयार नसते. यामुळे चिडलेला वीरू बसंतीशी आपले लग्न न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याची धमकी गावकऱ्यांना देतो. या धमकीला घाबरून गावकरी मावशीला तयार करतात. दरम्यान जय व ठाकुराची विधवा सून राधा यामध्ये प्रेम होते. गावातील जबलपूरला नोकरीसाठी जात असलेल्या अहमदला गब्बरसिंग ठार मारतो व रामगढाच्या लोकांना धमकी देतो. याचा सूड घेण्यासाठी जय-वीरू गब्बरसिंगाचे चार साथीदार मारतात. त्यामुळे गब्बरसिंग संतापतो.
एके दिवशी बसंती आणि वीरू गब्बरसिंगाच्या ताब्यात सापडतात. गब्बरसिंग वीरूला ओलीस धरून बसंतीला सर्वांपुढे नाचायला फर्मावतो. त्यावेळी जय गब्बरसिंगाला गोळीच्या टप्प्यात पकडतो त्यामुळे गब्बरसिंगाला वीरू व बसंतीला सोडावे लागते. तिघेही गोळ्या चुकवत पुलापाशी पोचतात व दरम्यान गोळ्या संपत आलेल्या असतात. जय जखमी होतो आणि वीरूला सांगतो, गावात जाऊन गोळ्या आणाव्यात. परंतु वीरू त्याला एकट्याला सोडून जाण्याचे नाकारतो. जय-वीरू यांच्यात नाणेफेक होते. त्यात जय जिंकतो. जय जखमी अवस्थेतही गब्बरसिंगाच्या साथीदारांना थोपवून धरतो. त्यांचा कायमचा बंदोबस्त तो पुलाखाली न फुटलेला बाँब फोडून करतो. गब्बरसिंगाचे सर्व साथीदार या स्फोटात मारले जातात. जय गंभीर जखमी होतो.
जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. वीरू गब्बरसिंगावर चालून जातो व त्याच्या साथीदाराना मारतो. तो गब्बरसिंगाला जिवानिशी मारणार, इतक्यात ठाकुर दिलेल्या वचनाची आठवण करून देतो व गब्बरसिंगाला त्याच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतो. ठाकुर हात नसले, तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरसिंगाला मारतो व शेवटी पोलीस येऊन हस्तक्षेप करतात व गब्बरसिंगाला अटक करतात. चित्रपटाच्या शेवटी जयच्या चितेला अग्नि देऊन वीरू परत चाललेला असतो व त्यावेळेस वीरूला ठाकुर बसंतीचा हात देतात.
अजरामर संवाद
शोले आजही लोकप्रिय आहे कारण त्यातील संवाद जनमानसात रुजलेले आहेत:
- “कितने आदमी थे?”
- “अरी ओ सांबा, इन कुत्तो के सामने मत नाचना.”
- “जो डर गया, समझो मर गया.”
- “ये हाथ मुझे दे दे ठाकूर.”
- “इतना सन्नाटा क्यों है भाई?”
हा चित्रपट काही संवादानी अजरामर केलेला आहे. ते म्हणजे कितने आदमी थे?, पचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है, तब उसकी मां कहती है, बेटा सो जा, नही तो गब्बर आ जायेगा., लोहा गरम है, मार दो हतोडा., इतना सन्नाटा क्युं है भाई?, ये हाथ नही फासी का फंदा है., ये हाथ मुझे दे दे ठाकूर., जो डर गया, समझो मर गया., अरी ओ सांबा, बसंती, इन कुत्तो के सामने मत नाचना. असे अनेक संवाद आज जनमानसात रुळलेले आहेत.
ज्येष्ठ पटकथाकार आणि संवाद लेखक सलीम जावेद यांनी अतिशय अप्रतिम अशी कथा साकारली. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या चिकाटीमुळे आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे शोले आज भारतीय चित्रपटसृष्टीत एक अजरामर कलाकृती म्हणून ओळखली जाते. ये दोस्ती हम नही तोडेंगे हे गाणे खऱ्या अर्थाने आज मैत्रीचे प्रतीक बनले आहे. जय आणि वीरू यांची मैत्री प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या भावभावनांचे एक अनोखे मिश्रण आहे. सर्वांच्या मेहनत आणि समर्पणवृत्ती यांचा उत्तम मिलाफ व अभिनय असल्याने शोले एका वेगळ्या उंचीवर पोहोचला. कथा, पटकथा, संवाद, अभिनय व संगीत या सर्व पातळीवर हा चित्रपट प्रभावी ठरला. पाण्याच्या टाकीवरचा सीन, आंब्याच्या बागेतील बसंतीचा शंकरदर्शनाचा सीन, जयनी मावशीकडे जाऊन विरूची स्तुती करण्याचा प्रसंग हे प्रसंग जबरदस्त आहेत. जया भादुरीनी साकारलेली संयमी आणि हृदयस्पर्शी राधा, अमजदखान यांची प्रभावी गब्बरसिंगची भूमिका आजही लोकप्रिय आहेत. या सर्वांच्यामुळेच शोले आज पन्नास वर्षे झाली तरी रसिकांच्या मनावर अभिराज्य गाजवत आहे आणि भविष्यातही गाजवील.
५० वर्षांनंतरही शोले हा फक्त चित्रपट नाही, तर एक भावना आहे.
जय–वीरूची दोस्ती, ठाकूरचा सूड, बसंतीचे नृत्य आणि गब्बरसिंगची दहशत आजही रसिकांच्या मनाला भिडते.
🎬 चित्रपटाची वैशिष्ट्ये
- ५.५ वर्षे सलग मिनर्व्हा थिएटर, मुंबई येथे प्रदर्शित
- त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट
- दिग्दर्शक – रमेश सिप्पी
- कथा व संवाद – सलीम-जावेद
- संगीत – आर.डी. बर्मन
- प्रमुख भूमिका – अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी, हेमामालिनी, अमजद खान
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
