ZP Election Update
ZP Election 2026 पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांत निवडणूक
ZP Election 2026 राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, राज्य निवडणूक आयोगाने आज अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर करत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. आयोगाच्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांना १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रक्रिया
या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचेही आयोगाने सांगितले.
पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांत निवडणूक
पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये ७३१ जिल्हा परिषद गट, १४६२ पंचायत समिती गण यांचा समावेश असून, तब्बल २ कोटी ९ लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या जिल्ह्यांचा समावेश
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत खालील जिल्हा परिषदांचा समावेश आहे –
कोकण विभाग – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग – छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
राजकीय हालचालींना वेग
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या निवडणुकांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात असून, स्थानिक राजकारणाला या निवडणुकांमुळे वेग येण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनीही तयारीला सुरुवात केली असून, आगामी काही दिवसांत प्रचाराला जोर येणार आहे. यामुळे ग्रामीण भागात आता निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम – सविस्तर
अधिसूचना प्रसिद्ध – १६ जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल – १६ ते २१ जानेवारी
अर्ज छाननी – २२ जानेवारी
अर्ज मागे घेणे व चिन्ह वाटप – २७ जानेवारी
मतदान – ५ फेब्रुवारी
सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०
मतमोजणी व निकाल – ७ फेब्रुवारी





