satara news वाघोली वसना नदीवरील पूल दहा महिन्यांपासून रखडला; नागरिकांचा संताप उफाळला

satara news पर्यायी मार्गाविना पूल पाडल्याने प्रवाशांचे हाल – धूळ, अपघात आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
रणजित लेंभे/ पिंपोडे बुद्रुक : satara news कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील वसना नदीवरील पुलाचे बांधकाम तब्बल दहा महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे. पूल पाडण्यापूर्वी कोणताही सुलभ पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता काम सुरू केल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ब्रिटिशकालीन जुना पूल आयुर्मान संपल्याने पाडण्यात आला. मात्र, स्थानिक ग्रामपंचायतींशी कोणतीही चर्चा न करता ठेकेदाराने पूल पाडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पूल पाडल्यानंतर वाहतूक सोनके मार्गे वळवण्यात आली; परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने प्रवाशांची अक्षरशः दमछाक होत आहे.
वाघोली-सोनके मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून त्याचा फटका पिंपोडे बुद्रुक बाजारपेठेलाही बसत आहे. ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर नदीपात्रातून तात्पुरती पाऊलवाट तयार करण्यात आली; मात्र दोन्ही बाजूंना उंच सुळके असल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात काहींना दुखापत झाली असून वाहनांचेही नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुलाच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची चर्चा आहे; मात्र प्रत्यक्षात काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. पूल पाडून जवळपास दहा महिने उलटले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही.
अलीकडे नदीपात्रातील रस्ता उंचावण्यासाठी मोठा भराव टाकण्यात आला आहे. हा उपाय आधीच केला असता तर अनेक अपघात टळले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र या भरावामुळे पुलाजवळील सुमारे २५ ते ३० व्यावसायिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खाद्यपदार्थ व पालेभाज्या विक्रेत्यांचेही मोठे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुढील महिन्यात कोरेगावच्या उत्तर भागात यात्रा-जत्रा आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. तसेच परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्ट्या लागल्याने या मार्गावरील वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पुलाचे काम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Wagholi Bridge News, Koregaon Taluka News, Vasana River Bridge, Satara News, Wagholi Sonke Road Problem, Koregaon Bridge Work Delay, Pimode Budruk Market News, satara news, koregaon news, wagholi bridge, vasana river bridge, pimode budruk news, road problem satara, bridge construction delay, satara local news, maharashtra news, koregaon taluka,





