Satara News अन् पोलिसही त्यांच्यासोबत बनले स्वच्छतेचे पाईक

लोणंदमध्ये शेकडो श्रीसदस्यांनी राबवली स्वच्छता मोहीम
गणेश भंडलकर/ लोणंद
Satara News Marathi श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने समाजहिताच्या उद्देशाने आयोजित स्वच्छता अभियान लोणंदमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या अभियानात शेकडो श्रीसदस्यांसह लोणंद पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले असून, त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून स्वच्छतेचे पाईक बनण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला व लोणंद आरोग्य केंद्र चकाचक केले.
दि. १ मार्च २०२६ (रविवार) रोजी सकाळी ७ वाजता लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात हे व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत लोणंद परिसरातील श्रीसदस्यांनी हातात झाडू, फावडे व स्वच्छतेची साधने घेऊन आरोग्य केंद्राच्या परिसराची सखोल साफसफाई केली. रस्ते, आवार, कचऱ्याचे ढिगारे तसेच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ परिसर स्वच्छ करणे एवढाच मर्यादित नसून, नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, सार्वजनिक आरोग्य जपणे आणि स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी रुजवणे हा होता. शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी झाला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लोणंद पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग. कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदारीपलीकडे जाऊन पोलिसांनी समाजोपयोगी उपक्रमात थेट सहभाग नोंदविल्याने उपस्थित नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला. पोलिसांच्या सहभागामुळे संपूर्ण मोहिम अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि प्रभावीपणे पार पडली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्त्व, आजारांपासून संरक्षण, स्वच्छ परिसरातून निर्माण होणारे आरोग्यदायी वातावरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छतेची सवय ही दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग व्हायला हवी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“स्वच्छ लोणंद – निरोगी लोणंद” हा संदेश देत हे स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या पार पडले. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.
हे पण वाचा Satara News पिंपोडेत मराठी भाषा दिनाचा गौरवशाली जागर
हे पण वाचा T20 World Cup 2026 ‘विंडीज’चा धुव्वा! टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री.





