Satara Crime News धक्कादायक: स्वतःचीच कार फोडून शेजाऱ्यांना गोवण्याचा ‘मामा-भाचा’ जोडीचा कट, सातारा पोलिसांनी केला उघड

Satara Crime News दोन वर्षांपासून गाड्या फोडण्याचा रात्रीस खेळ चाले,
सातारा | दि. ५ मार्च २०२६ Satara Crime News एखाद्या चित्रपटातील कथेलाही मागे टाकेल असा एक थरारक आणि तितकाच संतापजनक प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या गाडीची तोडफोड होत असल्याची तक्रार देऊन पोलिसांनाही चक्रावून सोडणारा तक्रारदारच अखेर ‘मास्टरमाइंड’ निघाला आहे. आपल्या शेजाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी चक्क स्वतःच्याच कारच्या काचा फोडणाऱ्या निवृत्त शिक्षकाला आणि त्याच्या भाच्याला सातारा शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमके प्रकरण काय?
क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त शिक्षक आण्णा शिवाजी पवार (वय ५९) यांनी गेल्या दोन वर्षांत (२०२४ ते २०२६) सातारा शहर पोलीस ठाण्यात तब्बल सहा वेळा तक्रारी दाखल केल्या होत्या. “अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी माझ्या कारच्या काचा फोडतात, गाडीवर दगडफेक करतात आणि एकदा तर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचाही प्रयत्न केला,” असा त्यांचा बनाव होता.
पवार यांनी आपल्या शेजाऱ्यांवर संशय व्यक्त केला होता. जागेच्या जुन्या वादातून शेजारीच हे कृत्य करत असल्याचा दावा त्यांनी वारंवार केला. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोलीस तपासाबाबत नाराजीही व्यक्त केली होती, ज्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
सा फुटला बिंग…
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी डी.बी. (गुन्हे शोध) पथकाला या प्रकरणाचा मुळापासून तपास करण्याचे आदेश दिले.
डी.बी. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या साहाय्याने तपास सुरू केला असता, शिरवळ येथील आकाश संजय इंगवले (वय २८) या तरुणावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखी कबुली दिली.
धक्कादायक सत्य: भाच्याला दिली होती ‘सुपारी’
तपासात समोर आले की, आकाश इंगवले हा तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षक आण्णा पवार यांचा मानलेला भाचा आहे. पवार यांनीच त्याला खंडाळ्याहून बोलावून आपल्या गाडीची तोडफोड करायला सांगितली होती. यामागे शेजाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासात टाकून त्यांना तिथून राहायला जाण्यास भाग पाडण्यासाठी हा प्रकार केला तसेच गाडीच्या नुकसानीपोटी विमा (Insurance) कंपनीकडून लाखो रुपयांची क्लेम रक्कम हडपल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आता या प्रकरणात फिर्यादी आण्णा पवार यांनाही सहआरोपी करत अटक केली आहे. तसेच आणखी कोणाचा सहभाग यात आहे या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.
सपोनि अविनाश माने आणि तपास पथक ऍक्शन मोड मध्ये
ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे आणि त्यांच्या पथकातील निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव व अन्य कर्मचाऱ्यांनी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी दोन वर्षपूर्वी याच विभागात दमदार काम केले होते, या आठवड्यात पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेत रुजू झाल्यावर त्यांनी सलग दुसरा गुन्हा उघडकीस आणत ऍक्शन मोड मध्ये आल्याचे कामातून दाखवून दिले.
हे पण वाचा Satara News शेतात टरबूज चोरायला आला अन चोरटा रंगेहाथ सापडला, थेट पोलिसांच्या ताब्यात





