Pune Leopard Attack
Pune Leopard Attack जुन्नर तालुक्यातील थरारक घटना, युवक जखमी
Pune News Leopard Attack: पुण्यातील नारायणगाव–जुन्नर रस्त्यालगत अंधारात मोबाईलवर बोलणे एका तरुणाच्या अंगलट आले असून तो अंधारात फोनवर बोलायला गेला असता बिबट्याने हल्ला केला, बिबट्याच्या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला आहे. अंधारात फोनवर बोलण्याची सवय कशी धोकादायक होऊ शकते याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास १८ वर्षीय तनिष नवनाथ परदेशी हा तरुण मोबाईलवर बोलत उभा असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याच्या नखांनी त्याच्या पोटरीवर खोल जखमा केल्या असून तनिष जखमी झाला.
मात्र नशीब बलवत्तर ठरल्याने त्याचा जीव वाचला. त्याला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी केली असता वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृहाजवळ सुमारे २०० फूट अंतरावर तीन बिबटे मुक्तपणे फिरताना आढळले. त्याच परिसरात काल चार पाळीव प्राण्यांवरही बिबट्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाढत्या धोक्याचा विचार करून वनविभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ओतूर, शेटेवाडी, शिवनेरी अशा भागांतील पूर्वीच्या घटनांमुळे वन्यजीव–मानव संघर्ष अधिक तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातही रात्री दोन बिबटे रस्त्यावर निर्भयपणे फिरताना दिसल्याने बिबट्यांची हालचाल पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील ईश्वरबुवा मंदिर परिसरात स्थानिकांनी या बिबट्यांचे व्हिडिओ काढले असून वनविभागाला माहिती देतानाच हे बिबटे ऊसाच्या शेतात अदृश्य झाले. ग्रामीण भागात वन्यजीव–मानवी संघर्ष झपाट्याने वाढत असल्याने रात्री बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुन्नर तालुक्यातील धोलवड येथेही रात्री पावणेदोनच्या सुमारास स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या घरासमोर बिबट्याचे दर्शन झाले असून परिसरात दहशत पसरली आहे. वाढत्या बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे, रात्री अंधारात फोनवर बोलण्यासाठी बाहेर न जाणे आणि कोणत्याही हालचालीची शंका आल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Pune News, Pune Leopard Attack, Narayangaon Junnar Leopard, Bibatya Halla Pune, Leopard Attack in Maharashtra, Wildlife Conflict Pune, Narayangaon News, Junnar Leopard News, Maharashtra Wildlife News, Leopard Sightings Pune, Pune Breaking News, Bibatya Attack Teenager, Leopard Movement Pune, Avsari Khurd Leopard Video, Dholwada Leopard Sighting,






