Thackeray Brothers Shivaji Park Mumbai Sabha
नाहीतर मराठी माणसासाठी हि शेवटची निवडणूक
Mumbai Election :१९ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; शिवाजी पार्कवरून आवाहन
मुंबई | प्रतिनिधी :
मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आली असून, मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, असा ठाम संदेश ठाकरे बंधूंनी दिला. शिवाजी पार्क येथे तब्बल १९ वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. या ऐतिहासिक सभेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सभेत बोलताना राज ठाकरे यांनी मुंबईच्या भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्वावर बोट ठेवले. “मुंबई गुजरातला जोडण्याचा विचार अगोदरपासूनच डोक्यात आहे. वाढवण बंदर, पालघर परिसर यापासून सुरुवात करून पुढे मुंबईपर्यंत पोहोचण्याचा दीर्घकालीन प्लान आखला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबई विकत घेता येत नसली, तरी पैशांच्या जोरावर जमीन खरेदी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदान प्रक्रियेबाबत ठाकरे बंधूंनी कार्यकर्त्यांना कडक सूचना दिल्या. मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून सर्व कार्यकर्ते आणि नेमलेले बीएलओ सतर्क राहावेत. दुबार मतदार आढळल्यास तात्काळ लक्ष देऊन आवश्यक कारवाई करावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईसह राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वर्षांनंतर दोन्ही नेते एकत्र दिसल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी या एकजुटीमागील भूमिका मांडली.
दरम्यान, विरोधकांकडून या एकत्र येण्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या, तरी ठाकरे बंधूंची ही एकजूट आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
