वाघोली: मार्गदर्शन करताना प्रा.विपीन वैराट (छाया: तेजस लेंभे)
Campus News कोरेगाव तालुक्यातील वाघोलीत वीर बाल दिन
तेजस लेंभे/ कोरेगाव
Campus News वाघोली ता.कोरेगाव येथील शंकरराव जगताप आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या सांस्कृतिक विभागातर्फे “वीर बाल दिन” उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रभक्ती, ध्येयवादी वृत्ती आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून प्राध्यापक डॉ. विपिन वैराट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत युवकशक्तीचे राष्ट्रनिर्मितीतले महत्त्व स्पष्ट केले. “युवकांनी केवळ शिक्षणापुरते सीमित न राहता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाप्रती जबाबदारी स्वीकारून प्रामाणिकपणे काम केल्यास देश अधिक सक्षम आणि सबळ बनेल. राष्ट्रभक्ती, नैतिकता आणि शिस्त ही मूल्ये आजच्या काळात टिकवणे अत्यावश्यक आहे. युवकांचा पराक्रम आणि ऊर्जा देशाच्या सेवेसाठी वाहिली गेली, तर भारताचे भविष्य अधिक उज्ज्वल ठरेल,” असे विचार त्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. लता अंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी वीर बालांच्या शौर्यगाथांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. “राष्ट्रहित हेच सर्वोच्च ध्येय मानून जीवन जगण्याची प्रेरणा या दिवसातून घेतली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
उपप्राचार्य डॉ. प्रताप जाधव यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी राष्ट्रविकासात आपले योगदान दिल्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही, असे नमूद केले.विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्यासाठी कार्यक्रमात सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी एकदिलाने देशनिष्ठा आणि समाजसेवा यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. प्रशांत रगडे यांनी केले. त्यांनी वीर बाल दिनाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व उलगडून सांगितले. प्राध्यापक रवींद्र कारंडे यांनी मनोगतातून कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.







