BIG NEWS दहिगावच्या रस्त्यांची चाळण; संतप्त ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात एल्गार, आंदोलनाचा इशारा

मुकुंदराज काकडे/ वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील दहिगाव परिसरातील गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज रस्त्यावर उतरून जोरदार निषेध व्यक्त केला. देऊर, घीगेवाडी आणि वाठार स्टेशनकडून येणारे प्रमुख रस्ते सध्या पूर्णपणे खड्डेमय झाले असून, यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रस्ते अक्षरशः उखडून निघाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुळीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या मते, या भागातून होणारी सततची अवजड वाहतूक रस्त्यांच्या दुरवस्थेला मुख्यत्वे कारणीभूत आहे. अवजड वाहनांच्या ओझ्याखाली रस्ते दबले जात असून, त्याकडे प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. याबाबत बोलताना सरपंच रणजीत चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आम्ही वारंवार प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी पत्रव्यवहार केला, मात्र दरवेळी केवळ आश्वासनेच पदरी पडली. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.”
या पार्श्वभूमीवर, “आता आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी,” अशी आक्रमक भूमिका दहिगावच्या नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाला ठाम इशारा देताना ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जर येत्या एका महिन्याच्या आत रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले नाही, तर उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे आणि रखडलेली कामे यामुळे रुग्णवाहिकांनाही मार्ग काढणे कठीण झाले असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सध्या ग्रामस्थांच्या वाढत्या आक्रोशामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनानंतर आता प्रशासन तातडीने रस्त्यांचे काम हाती घेणार की पुन्हा आश्वासनांचा खेळ मांडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






