IND vs NZ : गेल्या ६ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! गिल-गंभीरच्या एका निर्णयामुळे मोहम्मद सिराजची ऐतिहासिक मालिका खंडित!

Mohammed Siraj Record IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना क्राईस्टचर्चच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्लेईंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
प्रसिध कृष्णाला संघातून बाहेर करून गुरनूर ब्रारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात संधी न मिळालेल्या मोहम्मद सिराजला या सामन्यातही प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी देण्यात आलेली नाही. गिल आणि गौतम गंभीरच्या निर्णयामुळे मोहम्मद सिराजची गेल्या ६ वर्षांची ऐतिहासिक मालिका खंडित झाली आहे.
मोहम्मद सिराज Mohammed Siraj हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. सिराजला २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने सर्व परदेशी दौऱ्यांवर त्याने भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यासाठीही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे, पण २ पैकी एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गेल्या ६ वर्षांपासून परदेशात लागोपाठ कसोटी सामने खेळण्याची मालिका खंडित झाली आहे.
मुख्य बाब म्हणजे मोहम्मद सिराज Mohammed Siraj हा सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. या स्पर्धेतील ११ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ११ सामन्यांमध्ये ४३ गडी बाद केले आहेत. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विजय मिळवून देण्यात आणि गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या ओव्हल कसोटीत विजय मिळवून देण्यात सिराजने मोलाची भूमिका बजावली होती.
प्रसिध बाहेर, गुरनूर ब्रारचं पदार्पण
मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह अंशुल कंबोज, आकाशदीप आणि प्रसिध कृष्णा यांना संधी देण्यात आली होती. मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी वेगवान गोलंदाजी आक्रमणात बदल करण्यात आला आहे. प्रसिध कृष्णाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. केवळ सिराज नव्हे, तर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला देखील प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यातही जडेजाला विश्रांती देण्यात आली होती.










