Diwali Fesitval वाघोलीत सामाजिक ऐक्याची दिवाळी; गोपाळ समाज व ऊसतोड कामगारांना फराळ, महिलांना भाऊबीजेनिमित्त साडीवाटप!

Diwali Fesitval शनि देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या पुढाकारातून उपक्रम
सातारा/प्रतिनिधी
दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचा सण. या सणाचा खरा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उदात्त भावनेतून वाघोली येथे गोपाळ समाज व ऊसतोड कामगार बांधवांसोबत दिवाळी सण साजरा करण्यात आला. सोळशी येथील Shani Maharaj Temple शनि देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
दिवाळीनिमित्त गोपाळ समाज व ऊसतोड कामगार बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच भाऊबीजेचे औचित्य साधून महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. सण-उत्सवाच्या आनंदापासून समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि सर्वांनी एकत्रितपणे सण साजरे करावेत, या भावनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, केवळ वस्तूंचे वाटप करून हा उपक्रम मर्यादित न ठेवता सर्वांना सोबत घेऊन एकत्रित दिवाळी साजरी करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेतला. एकमेकांशी संवाद साधत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. समाजातील विविध घटकांमध्ये आपुलकी, विश्वास आणि सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा समाजातील कष्टकरी आणि वंचित घटक सण-उत्सवाच्या आनंदापासून काहीसे दूर राहतात. विशेषतः ऊसतोड कामगार आणि गोपाळ समाजातील कुटुंबांनाही सणाचा आनंद घेता यावा, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होता यावे, या भावनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला. दिवाळीच्या निमित्ताने माणुसकीचे नाते अधिक घट्ट करण्याचा आणि समाजात एकतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
या उपक्रमामुळे उपस्थित महिला, लहान मुले आणि कष्टकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा हा दिवाळी सोहळा वाघोली परिसरात चर्चेचा विषय ठरला.
याप्रसंगी कुमार भोईटे, जगन्नाथ (लाला) भोईटे, माजी उपसरपंच बंडूभाई नेवसे, राजेंद्र कोरडे, दीपक नाना भोईटे, आप्पा जायकर, प्रशांत तावरे, धनंजय नेवसे, तेजस कोरडे, धीरज पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











