Banking News : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची २००० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल

संस्थापक रामभाऊ लेंभे यांची माहिती
प्रकाश राजे /सातारा
Banking News पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही मार्चनंतर सात महिन्यांत ठेवींमध्ये ६९ कोटी ८२ लाखांची वाढ झालेली आहे.ग्राहकांना डिजीटल बॅंकींग व मोबाईल बॅंकींग सुविधा दिल्या जात असल्याने ग्राहक समाधानी असल्याने संस्थेने २००० कोटी संमिश्र व्यवसायाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. याचे श्रेय संचालक मंडळ,सेवक वर्ग,सभासद व ग्राहकांना जाते असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले.
दिपावलीच्या पूर्वसंध्येला सभासद,ग्राहक व हितचिंतक यांना दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त करताना छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे मुख्यालय पिंपोडे बुद्रुक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

ग्रामीण भागातून शहरांकडे झेप घेऊन ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून ५८ शाखा विस्तार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांचा कारभार संगणकीकृत,डिजिटल बॅंकींग,मोबाईल बॅंकींग सुविधा ग्राहकांना दिल्या जात असल्याने ग्राहकाना घरबसल्या जलद व तत्पर सेवा मिळत आहे.संचालक मंडळामध्ये साधकबाधक चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतले जात असल्याने गेले ३७ वर्षात आमच्यामध्ये कोणतेही मतभेद झाले नाहीत.त्यामुळे संस्थेची प्रगती होत आहे.सेवक वर्ग प्रामाणिकपणे काम करीत ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा देत असतो.शाखांचे स्थानिक सल्लागार मंडळाची अधूनमधून मिटींग घेऊन शाखेतील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संस्थेने लाभता,रोखता या बाबींचा विचार करून उत्तम प्रकारे तरलता ठेवली आहे.
सध्याची दुष्काळी परिस्थिती पहाता वसूलीत अडचणी येण्याची शक्यता आहे.नफ्यातून तरतुदी कराव्या लागतात.एनपीए वाढला की भविष्यात अडचणी येतात.त्यामुळे येत्या काही महिन्यात प्रत्येक बाबतीत खर्चात काटकसर करून एनपीए कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संस्थेकडे मार्च अखेर ठेवी ९१८ कोटी १ लाख होत्या.त्यामध्ये ७ महिन्यात तब्बल ६९ कोटी ८२ लाखांची ठेववाढ होऊन ऑक्टोबर २०२६ अखेर ९८७ कोटी ८३ लाखांच्या ठेवी झाल्या आहेत.मार्चनंतर ७ महिन्यात कर्जवाटपामध्ये २० कोटी ५ लाखांची वाढ होऊन ६९४ कोटी ८४ लाख कर्जवाटप झाले आहे.मार्चअखेर १५९२ कोटी ३४ लाख संमिश्र व्यवसाय होता.त्यामध्ये ७ महिन्यात ९० कोटी ३३ लाखांची वाढ होऊन ऑक्टोबर २०२६ अखेर १६८२ कोटी ६७ लाख संमिश्र व्यवसायाची भरारी घेतली आहे.मार्चअखेर गुंतवणूक २५१ कोटी ९२ लाख होती.त्यामध्ये ७ महिन्यात ८५ कोटी ३४ लाखांची वाढ होऊन ऑक्टोबर २०२६ अखेर ३३७ कोटी २६ लाख गुंतवणूक केली आहे.मार्चनंतर खेळते भांडवलात ७५ कोटी १ लाखांची वाढ होऊन १०९३ कोटी ८७ लाख झाले आहे.मार्चअखेर सोनेतारण कर्जवाटप ३७६ कोटी ४१ लाख होते.त्यानंतर ७ महिन्यात सोनेतारण कर्जात ११कोटी ३८ लाखांची वाढ होऊन ३८७ कोटी ७९ लाख (एकूण कर्जाच्या ५६ टक्के) सोनेतारण कर्जवाटप केले आहे.मार्चअखेर सोनेतारण व ठेवतारण कर्जवाटप ४३३ कोटी २१ लाख होते.त्यामध्ये वाढ होऊन ऑक्टोबर २०२६ अखेर ४३५ कोटी ५६ लाख (एकूण कर्जाच्या ६३ टक्के) सोनेतारण व ठेवतारण कर्जवाटप केले आहे.मार्चअखेर स्वनिधी ७८ कोटी १३ लाख होता.त्यामध्ये ३ कोटी ५२ लाखांची भर पडून ऑक्टोबर २०२६ अखेर ८१ कोटी ६५ लाख स्वनिधी झाला आहे.अशा प्रकारे नियोजनबध्द कारभार करीत संस्थेने सांपत्तिक स्थितीचा आलेख उंचावत ठेवला आहे असे संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी सांगितले.











