Ashtavinayak Darshan मोरगावचा श्री मयूरेश्वर: इतिहास, पौराणिक कथा आणि अष्टविनायक पहिले पीठ | Morgaon Mayureshwar Temple

Ashtavinayak Darshan Morgaon Mayureshwar Temple अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान लाभलेले मोरगावचे श्री मयूरेश्वर मंदिर हे गणेश भक्तांचे अत्यंत श्रद्धास्थान आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि सांगता मोरगावच्या याच पवित्र मंदिरात होते. तीर्थयात्रेच्या शेवटी जर यात्रेकरू मोरगाव मंदिराला भेट देत नसेल, तर ही यात्रा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे अष्टविनायक परिक्रमा आणि गणपत्य पंथाच्या उपासनेमध्ये मोरगावच्या मयूरेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मंदिर वास्तुकला आणि ऐतिहासिक संदर्भ हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून त्याला ५० फूट उंच भव्य संरक्षण भिंत आणि चारही कोपऱ्यांवर मनोरे (मिनार) आहेत. मोगल किंवा आदिलशाही काळात मंदिरावर परकीय आक्रमण होऊ नये, या उद्देशाने मंदिराच्या बाह्य रचनेला गढी किंवा मशिदीसारखा आकार देण्यात आला आहे. हे मंदिर बहामनी काळात बांधले गेले असून, आदिलशाही कालखंडातील पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे यांनी याच्या बांधकामात मोलाचे योगदान दिले. या मंदिराचे आणखी एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोर असलेली नंदीची भव्य मूर्ती होय. आख्यायिकेनुसार, शंकराच्या मंदिरासाठी रथातून नेली जाणारी ही नंदीची मूर्ती मोरगावला आल्यावर रथाचे चाक तुटल्याने याच ठिकाणी कायमस्वरूपी स्थापित झाली.
श्री मयूरेश्वराची मूर्ती व गर्भगृहाची वैशिष्ट्ये गर्भगृहातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे जडवलेले असून मस्तकावर नागराजाचा फणा विराजमान आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून समोर मूषक आणि मयूर (मोर) बसलेले आहेत. या मंदिराला चार मुख्य दिशांना चार दरवाजे असून प्रत्येक दारावर वेगवेगळ्या युगातील गणेश रूप दर्शवले आहे. पूर्वेकडील दरवाजावर प्रभू राम व सीतेसह बल्लाळविनायक धर्माचे प्रतीक म्हणून, दक्षिणेकडील दारावर शिव-पार्वतीसह विघ्नेश अर्थाचे प्रतीक म्हणून, पश्चिमेकडील दारावर चिंतामणी कामाचे प्रतीक म्हणून आणि उत्तरेकडील दारावर महागणपती मोक्षाचे प्रतीक म्हणून विराजमान आहे.
पौराणिक कथा आणि मोरगाव नाव पडण्यामागचा इतिहास पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात सिंधू नावाच्या असुराने तिन्ही लोकांत प्रचंड उत्पात माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवांनी आराधना केल्यावर गणपतीने मयूरावर (मोरावर) आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे या गणपतीला ‘मयूरेश्वर’ आणि या परिसराला ‘मोरगाव’ हे नाव पडले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, ब्रह्मदेव पूजेसाठी पात्रातून पाणी घेऊन जात असताना अडखळले आणि त्या पात्रातील सांडलेल्या पा्यातून पवित्र कऱ्हा नदीचा उगम झाला, जी आजही मोरगावमधून वाहते. गणेशपुराणानुसार मोरगाव हे गणपत्य पंथाचे प्रमुख अध्यायपीठ असून भूलोकावरील हे सर्वात पवित्र गणेशस्थान मानले जाते.
संस्कृती, पेशवेकालीन वारसा आणि प्रशासन प्रसिद्ध गणेशभक्त संत मोरया गोसावी चिंचवडला जाण्यापूर्वी मोरगावच्या याच मंदिरात नित्यनेमाने पूजा करत असत. तसेच १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी मोरगावच्या मयूरेश्वराचे मनमोहक रूप पाहून ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही अजरामर आरती रचली. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याच्या पेशव्यांनी गणपतीला आपले कुलदैवत मानून या मंदिराला जमिनी आणि रोख सनद दान केली. सध्या या ऐतिहासिक मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनाखाली अत्यंत उत्तम रीतीने चालवले जाते.
लेखक:
सहाय्यक प्राध्यापक सूर्यकांत शामराव अदाटे
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर
संपर्क: ९९७५७५९३२५











