Nitin Patil Rajya Sabha MP News: घिगेवाडीच्या विकासासाठी खासदार नितीन पाटील यांना साकडे; विविध विकासकामांसाठी सरपंचांची निवेदनाद्वारे मागणी!

कोरेगाव | Maharashtra One News
Nitin Patil Rajya Sabha MP News कोरेगाव तालुक्यातील मौजे घिगेवाडी (चिघेवाडी) येथील विविध मूलभूत व पायाभूत विकासकामे पूर्ण व्हावीत, या संदर्भात ग्रामपंचायत घिगेवाडीच्या वतीने राज्यसभा खासदार नितीन पाटील यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे. गावातील प्रलंबित आणि अत्यंत आवश्यक असणारी कामे खासदार निधी तसेच शासनाच्या इतर निधीतून लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, अशी ठाम मागणी घिगेवाडीच्या सरपंचांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीकडून निवेदनात मांडण्यात आलेली प्रमुख विकासकामे
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या कामांची यादी निवेदनात देण्यात आली आहे. यामध्ये गावातील श्री काळूबाई देवी मंदिराचा सभा मंडप उभारणे तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार गावातील गावठाण हद्दवाढ मंजुरीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गावातील दळणवळण सुलभ व्हावे म्हणून अंतर्गत प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे आणि शिवारातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी वसना नदीवर नवीन बंधारे बांधण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शाळा सुधारणा आणि तरुणांसाठीच्या सुविधांवर भर
शैक्षणिक दर्जा आणि सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घिगेवाडी येथे वॉल कंपाउंड उभारणे, टॉयलेट-बाथरूमसह स्वतंत्र वर्गखोली बांधणे आणि शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गावातील तरुणांच्या आरोग्यासाठी आणि क्रीडा कौशल्याला वाव मिळण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा व आधुनिक जिम साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
गावाच्या विकासासाठी भरीव निधी मिळण्याची ग्रामस्थांना अपेक्षा
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन ही सर्व कामे अत्यंत महत्त्वाची असल्याचे सरपंचांनी नमूद केले आहे. खासदार नितीन पाटील यांच्या सकारात्मक सहकार्यातून आणि पाठपुराव्यातून घिगेवाडी गावातील ही सर्व प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर मार्गी लागतील, असा सरपंच नारायण सावंत यांनी व्यक्त केला यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत यांच्यासह माजी उपसरपंच आदिनाथ सावंत, सोसायटी चेअरमन धनसिंग सावंत, सोसायटी संचालक लक्ष्मण सावंत, डॉ. पोपट सावंत, सोसायटी उपाध्यक्ष भरत घिगे,सतिश मधुकर धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.












