Health Insurance For Journalists उत्तर कोरेगावातील पत्रकारांच्या आरोग्य विम्यासाठी सहकार्य करणार : रामभाऊ लेंभे

पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेकडून सन्मान
वाठार स्टेशन/ महाराष्ट्र वन वृत्तसंस्था
Health Insurance For Journalists समाजातील समस्या, अन्याय आणि विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच जनजागृती व समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा पत्रकार हा समाजव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये पत्रकारांच्या या बहुमूल्य योगदानाची जाणीव ठेवून आगामी काळात उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांच्या आरोग्य विम्यासाठी (Health Insurance) सहकार्य करण्यात येईल, अशी ठाम ग्वाही छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक तथा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांनी दिली.
संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार
पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना रामभाऊ लेंभे म्हणाले की, पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये पत्रकारांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे काम पत्रकार सातत्याने करत असतात. त्यामुळे पत्रकारांच्या विकासात्मक योगदानासाठी संस्था यापुढेही नेहमीच कटिबद्ध राहील.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन
या कार्यक्रमात उत्तर कोरेगाव मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राहुल लेंभे, उपाध्यक्षपदी शैलेश धुमाळ, कार्याध्यक्षपदी संजय कदम, सचिवपदी रणजीत लेंभे आणि खजिनदारपदी जलालखान पठाण यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक रामभाऊ लेंभे, भावेश ढमाळ, अशोक लेंभे आणि किशोर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय ग्रामपंचायत पिंपोडे बुद्रुक, सोनके, वाठार स्टेशन, देऊर व घिगेवाडी तसेच पिंपोडे जिमखाना असोसिएशन, वाठार पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय, रिपाईचे राहुल वाघाबरे, धनाजी मोहिते, विकास मतकर आणि क्रांतिवीर भोईटे आदींच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
अपघाती विमा उतरवणारा पहिला पत्रकार संघ
उत्तर कोरेगाव पत्रकार संघाने पत्रकार बांधवांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून यास समाजातील विविध संस्था व व्यक्तींचा प्रतिसाद मिळत आहे. सर्व सदस्यांचा अपघाती विमा भारतीय पोस्ट Accidental Insurance उतरवणारा उत्तर कोरेगाव संघ राज्यातील पहिला पत्रकार संघ असून यापुढेही दिशादर्शक उपक्रम राबविण्यावर संघाचा भर राहील. असे मत अध्यक्ष राहुल लेंभे यांनी व्यक्त केले व Health Insurance साठी पुढाकारात सहकार्य करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था परिवाराचे आभार मानले.












