देऊर जिल्हा परिषद शाळेचे नाणं खणखणीत वाजलं, ‘ITSE’ परीक्षेत घवघवीत यश; 8 विद्यार्थी केंद्रात चमकले!

देऊर: गुणवत्ता आणि कौशल्याच्या जोरावर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ITSE Exam परीक्षेत अत्यंत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या व देऊर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत एकूण ७ जणांनी केंद्रपातळीवर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाणे खणखणीत वाजवले आहे.
या यशस्वी घोडदौडीत इयत्ता पहिलीतून सार्थक किशोर कदम याने १८० गुण मिळवून केंद्रामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीमधून विघ्नेश अतुल चव्हाण याने १८० गुणांसह केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर ईशान प्रकाश कुंभार (१६८ गुण) आणि श्रुतिका शंकर हत्तरके (१६८ गुण) या दोघांनी केंद्रात संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला.
इयत्ता तिसरीमधून जिज्ञासा प्रशांत कदम हिने २३६ गुणांसह केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून बाजी मारली, तसेच चैत्रा निलेश चव्हाण हिने २२२ गुणांसह द्वितीय, तर कौस्तुभ मिलिंद काकडे याने १९६ गुणांसह केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता चौथीमधून प्रेम शंकर हत्तरके याने २३२ गुणांसह केंद्रपातळीवर तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा नवनाथ शिंदे म्हणाल्या की, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम असले की कोणतीच गोष्ट अशक्य नसते, हेच आमच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ITSE ही तर केवळ सुरुवात असून भविष्यात हे विद्यार्थी आणखी मोठी उज्ज्वल झेप घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे आणि पालकांचे आता सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मुख्याध्यापिका शोभा नवनाथ शिंदे, उपशिक्षक रमेश मारुती चव्हाण, सुनिता संजय गायकवाड, वैशाली रमेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ आणि पालकांच्या वतीने सर्व यशस्वी बालकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस व कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.












