Womens day लेकींच्या जन्माचे अनोखे स्वागत, बारश्याला सुरु केल्या मुलींच्या नावे संस्था आणि गुणवंत महिलांचा गौरव

Womens day लेकींच्या जन्माचे अनोखे स्वागत, बारश्याला सुरु केल्या मुलींच्या नावे संस्था आणि गुणवंत महिलांचा गौरव

Womens day: साताऱ्यातील नमिता मोरे-गणेश मोरे दांपत्याचे सामाजिक व्हिजन

सातारा/प्रतिनिधी

Womens day महिला दिन सगळी कडेच विविध उपक्रमांनी साजरा होत असताना साताऱ्यातील नमिता मोरे-गणेश मोरे या दांपत्याने एक प्रबोधनपर पाऊल उचलत आपल्या लेकीच्या जन्माचे स्वागत आगळं वेगळया पद्धतीने केले व सामाजिक व्हिजन जपलं. महिला दिनाच्या औचित्याने त्यांनी आपल्या लेकीच्या बारशाला मुलींच्या नावाने मनस्वी फाऊंडेशन व ज्ञानस्वी पब्लिशिंग हाऊस या सामाजिक संस्थांचा शुभारंभ केला तसेच या नामकरण सोहळ्यात स्त्री शक्तीचा सन्मान करीत यशस्वी व गुणवंत महिलांचा, विद्यार्थिनीचा गौरव करून पारंपरिक घरगुती उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची झालर दिली.

साताऱ्यात महिला दिनाच्या निमित्ताने एका आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नमिता मोरे-गणेश मोरे या दांपत्याने त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा, स्त्री शक्ती सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि कन्येच्या नावाने नवीन प्रकाशन संस्थेचा शुभारंभ अशा विविध उपक्रमांनी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प. शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे उपस्थित होते, तर प्रसिद्ध लेखिका व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या माजी उपायुक्त विद्या जगताप-पोळ यांच्या हस्ते नव्या प्रकाशन संस्थेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना मनस्वी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि व्हिजन अकॅडमीचे संचालक प्रा. गणेश तानाजी मोरे यांनी केली. समाजात विशेषतः दुसऱ्या कन्येच्या जन्मानंतर दिसणारा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा सकारात्मक संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मोरे कुटुंबीयांच्या कन्येचा नामकरण सोहळा अनोख्या पद्धतीने चित्रफितीद्वारे पार पडला. कन्येला “ज्ञानस्वी” असे नाव देण्यात आले. तसेच तिच्याच नावाने “ज्ञानस्वी पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोरे सरांच्या प्रथम कन्येच्या नावाने कार्यरत असलेल्या मनस्वी फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ‘स्त्री शक्ती सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.

या सन्मानार्थींमध्ये सौ. माधुरी पाटील (शिक्षण व समाजसेवा), सौ. शिला काकडे आणि सौ. साक्षी चव्हाण (पूर्वप्राथमिक संस्कारमय शिक्षण), डॉ. प्रियदर्शनी कांबळे (उच्च शिक्षण व समाजसेवा), कु. अदिती स्वामी (आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या) आणि कु. आरोही आवारे (उद्योनमुख कुस्तीपटू) यांचा समावेश होता. तसेच व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थिनी अफिया शेख, सृष्टी बडदरे, श्रेया पवार आणि सिद्धी पवार यांचा एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशाबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी कै. महादेव दाजी मोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जि.प. प्राथमिक शाळा रेवडी येथील विद्यार्थ्यांना महामानव आणि वैज्ञानिकांच्या चरित्रावर आधारित बालसाहित्य भेट देण्यात आले. तसेच ज्ञानस्वी पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित होणाऱ्या पहिल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरणही करण्यात आले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे चित्रकार विजय लोहार तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे डिजिटल सादरीकरण करणारे मयूर भोसले यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

आपल्या मनोगतात विद्या जगताप-पोळ यांनी सांगितले की, जसे पुणे, नागपूर आणि नाशिक ही शहरे प्रकाशन संस्थांमुळे ओळखली जातात, तसेच भविष्यात साताऱ्याचाही लौकिक वाढावा. तसेच दोन्ही कन्यांच्या नावाने संस्था स्थापन करून स्त्री जन्माचे स्वागत करण्याच्या या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात धनंजय चोपडे यांनी मनस्वी फाऊंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पारंपारिक नामकरण सोहळ्यासाठी आलेल्या महिलांनाही या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमातून प्रेरणादायी अनुभव मिळाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, फाऊंडेशनचे सदस्य आणि मार्गदर्शक प्राचार्य प्रदीप ढाणे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना डफळे यांनी केले, तर सचिव नमिता मोरे आणि माधवी मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. Womens day

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू