उत्तर कोरेगाव तालुक्याचा शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. तुम्ही त्यागाची तयारी ठेवा मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास आ.रामराजे ना.निंबाळकर यांनी उत्तर कोरेगावच्या जनतेला दिला.
गुढी पाडवा हा आ.रामराजेंचा जन्मदिवस,त्यांच्या अभिष्टचिंतना साठी घिगेवाडी ता.कोरेगाव येथे उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी.आ.दिपक चव्हाण, घिगेवाडीचे सरपंच नारायण सावंत,उपसरपंच तेजस्विनी सावंत आदिनाथ सावंत,अजित सावंत, धनसिंग सावंत, गजानन घिगे, भास्कर घिगे, राजेंद्र सावंत,सुधीर सावंत, यांची उपस्थिती होती. त्यावेळी आ.रामराजे बोलत होते. कोणताही प्रश्न सहा महिने-एका वर्षात सुटत नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. माझे राजकीय जीवन पाणी संघर्षांसाठी गेले आज काल मी केलं म्हणून लबाड लोकं जनतेची दिशाभूल करीत आहेत.फलटणचा सुरळीत चाललेला संसार अनेकांना बघवत नाही.एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसं नाही,हे लक्षात ठेवा.
दुष्काळी भागाला पाणी देणे हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.पुराचे वाहून जाणारे पाणी वळवून ते दुष्काळी भागाला देणे ही माझी संकल्पना आहे.आज फलटण तालुक्यात बागायती क्षेत्र वाढलेले दिसत आहे.त्यासाठी गेली पंचवीस वर्षे मी मेहनत घेतली आहे.धोम-बलकवडीचा कॅनॉल किती किलोमीटरचा आहे,नीरा-देवघरसाठी निधी कुठून आणि कसा मिळाला हे आज नारळ फोडणाऱ्याना माहिती आहे का?असा प्रश्न त्यांनी विरोधकांना केला.
उत्तर कोरेगाव तालुका गेली पंधरा वर्षे आमच्यासोबत आहे.तुमची पाण्यासाठी चाललेली तळमळ मला दिसत आहे. त्यासाठी प्रस्तावित सोळशी धरणातील किमान तीन टीएमसी पाणी आपल्याला प्राधान्याने मिळायला हवे.म्हणूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत.लवकरच त्यासंदर्भात बैठक लावून आपला प्रश्न मार्गी लावू.मात्र कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही.त्यासाठी पाठपुरावा आवश्यक असतो.याशिवाय हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी लागते.गरज पडल्यास तुमच्यासोबत मी ही संघर्ष करेन हा शब्द तुम्हाला मी माझ्या जन्मदिनी देतोय.आता वय झालंय हे खरं आहे. पण डोकं अजून चालतंय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.असा सूचक इशारा ही त्यांनी विरोधकांना दिला.
प्रारंभी वाढदिवसानिमित्त उत्तर कोरेगाव तालुक्याच्या वतीने केक कापून आ.रामराजेंचे अभिष्टचिंतन करण्यात आले.लक्ष्मण सावंत,सुदाम सावंत,निलेश सावंत,अशोक घिगे,चंद्रभागा साळुंखे,रोहित सावंत,सुधीर सावंत,पराग सावंत, अर्चना सावंत, पिंपोडे बुद्रुक, सोनके, सोळशी, रणदुल्लाबाद,करंजखोप,वाघोली, सर्कलवाडी वाठार स्टेशन, तडवळे सं.वाघोलीसह परिसरातील राजेप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.