Headlines

Yashwantrao Chavan: आधुनिक महाराष्ट्राचा ‘यशवंत’ वारसा

Yashwantrao Chavan Bio

Yashwantrao Chavan : भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा कालखंड हा भारताच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण कालखंड मानला जातो. यात महाराष्ट्राचे योगदान अतिशय मौल्यवान आहे. अशा या महाराष्ट्राच्या मातीत, संस्कृतीत, मराठी भाषेवर व मराठी जनतेवर मनापासून प्रेम करणारे ख्यातनाम लेखक, मुत्सद्दी, प्रशासक, ग्रंथप्रेमी, साहित्यिक, राजकारणपटु, उत्कृष्ट संसदपटु व प्रभावी वक्ता असे व्यक्तीमत्त्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. आज १२ मार्च यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन. आज या निमित्ताने त्यांच्या जीवनपटलावर टाकण्यात आलेला प्रकाश …..

Yashwantrao Chavan :संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१४ रोजी सांगली जिल्हयातील देवराष्ट्रे या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण वकिलीच्या व्यवसायाकडे वळले पण यातच ते पूर्ण गुंततील याची खात्री नव्हती. कौटुंबिक व मानसिक ओढातानीनंतर त्यांनी आपली पत्नी वेणुताई यांच्यासमोर आपली राजकारण व समाजकारणाची आवड व्यक्त केली. वेणुताईनीही या गोष्टीला संमती दिली.

सन १९३० साली म. गांधींनी सुरू केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. १९३२ सालच्या पहिल्या राजकीय कारावासाच्या काळात त्यांनी कार्ल मार्क्स व मानवेंद्रनाथ रॉय यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडला तथापि त्यांची गांधी-नेहरूंनी अनुसरलेल्या मार्गावर निष्ठा होती. यशवंतरावांच्या घाईगर्दीच्या राजकीय जीवनातही त्यांच्या मित्रपरिवाराला अनन्य साधारण महत्त्व होते. नाना पाटील, रत्नाप्पा कुंभार, किसन वीर, वसंतदादा पाटील व नरूभाऊ लिमये यांच्याशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

सन १९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनातही त्यांनी भाग घेऊन भूमीगत राहुन कार्य केले. त्यामुळे ते पकडले गेले व तुरूंगवासाची शिक्षा झाली. पुढे १९४६ मध्ये मुंबई प्रांताच्या विधीमंडळाची निवडणुक होऊन त्यात ते कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले व सांसदीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. १९५२ च्या निवडणूकीत यशवंतरावांची मुंबई प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली व ते मंत्री झाले. १९५२ ते १९५६ या काळात त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाचे सदस्य म्हणुन काम केले. १९५७ मध्ये महाराष्ट्र गुजरात या व्दिभाषिक मुंबई राज्याचे ते मुख्यमंत्री बनले. पुढे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.

यशवंतरावांनी नेहमी बेरजेचे राजकारण केले. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. द्विभाषिकांची संयुक्त महाराष्ट्रात रूपांतर होण्याच्या दरम्यान त्यांना प्रखर विरोध झाला. यशवंतराव जिकडे जातील तिकडे काळी निशाणे दाखविण्यात आली. या सर्व विरोधांचे हलाहल त्यांनी पचवून या कठीण परिस्थितीवर त्यांनी मात केली. महाराष्ट्र निर्मितीसाठी पं. नेहरू, गोविंद वल्लभपंतांचे मन वळविले परिणामी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

सन १९६२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ‘हिमालयाच्या रक्षणासाठी सहयाद्री आपल्या छातीचा कोट करेल’ हे वचन दिल्याप्रमाणे त्यांनी सार्थ केले. १९७९ मध्ये पंतप्रधान चौधरी चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाणांनी उपपंतप्रधानपद भुषविले होते. भारताच्या आठव्या वित्त आयोगाचेही ते अध्यक्ष होते. लोकशाही, नियोजन व समाजवाद या तीन आधारस्तंभावर राष्ट्रीय प्रगती अवलंबून असल्याचे ते म्हणत.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात समाजाच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर इतका प्रभाव असणारा, समाजजीवन घडविणारा दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही म्हणूनच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ असे म्हणतात.

महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासाचा पाया त्यांनी उभा केला. सहकारातुन समाजवाद निर्माण होईल अशी धारणा असल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळ सक्रीय करून अर्थकारणात व पर्यायाने राजकारणात एक जबरदस्त सहकारी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृषी, औद्योगिक समाजरचना करण्यासाठी खंबीरपणे आणि दृष्टेपणाने पाऊल टाकणारे यशवंतराव एकमेव राजकीय नेते होते. शेतीसाठी कर्जपुरवठा करणे, उत्पादित शेतीमालाची विक्री करणे. शेती विकास, शेती मालावर प्रक्रिया, घरबांधणी, दुग्धोपालन, कुक्कुटपालन इ. सहकारी संस्थांना चालना मिळाली. या सहकारी संस्थांना कर्जपुरवठयाची सोय, सहकारी बँका, भूविकास बँका यांच्यामार्फत करण्यात येऊ लागला. त्यांच्या सरकारनेच १८ सहकारी साखर कारखान्याची प्रथम नोंद करून सहकारात नवा विक्रम केला.

यशवंतरावांचे जीवन म्हणजे सत्यशोधक समाजाचा, स्वातंत्रचळवळीचा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा आणि नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाणांना राजकारणा प्रमाणेच समाजकारण, साहित्य, कला व उद्योगजगत या क्षेत्रातही रस होता तसेच त्यांनी या प्रत्येक क्षेत्रातला माणूस उभा केला. त्यांनी भाषा संचलनालय आणि महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाची निर्मिती व मराठी विश्वकोशाची योजना ही त्यांची ऐतिहासिक महत्त्वाची कार्ये होती. सन १९७५ मध्ये कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन त्यांची निवड झाली होती.

यशवंतराव नुसते मुरब्बी राज्यकर्तेच नव्हते ते साहित्यप्रेमी, कलाप्रेमी रसिक होते. नाट्यसंमेलन, साहित्यसंमेलन यांना यशवंतरावजी आवर्जून हजर असायचे. मराठी नाटकावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘विचाराशिवाय कांती नाही आणि विचारांच्या वणव्याला मातृभाषेच्या वाऱ्याशिवाय गती नाही’ असे ते म्हणत, मानवतावादी साहित्यावर त्यांचा भर होता. रसिक अभ्यासक असणाच्या यशवंतरावांचे ‘सहयाद्रीचे वारे’ व ‘युगांतर’ या नावाचे त्यांच्या भाषणाचे दोन संग्रह आहेत तसेच ‘कृष्णाकाठ’ आणि ‘ऋणानुबंध’ ही त्यांची आत्मचरित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. विज्ञानाइतकाच त्यांना अध्यात्माबददल आदर होता.

यशवंतरावांच्या कर्तृत्वात आणि संस्कारात त्यांच्या मातोश्रीचा जेवढा महत्वाचा वाटा आहे तितकाच मोटा वाटा त्यांच्या पत्नी सौ. वेणुताई यांचा आहे. चव्हाण कुटुंबात प्रवेश केल्यापासुन त्यांनी अडचणीचे आणि संकटांचे अनेक दिवस पाहिले. पण मनाने खंबीर असणाऱ्या वेणुताईंनी पतीच्या जीवनाशी समरस होऊन आदर्श गृहिणीप्रमाणे संसार केला. मात्र वेणुताईंच्या निधनानंतर यशवंतराव अक्षरश: अबोल व निश्चल झाले.

वेणुताईच्या मृत्यूनंतर अवघ्या दीड वर्षात आयुष्यभर सत्तेच्या राजकारणात राहूनही राजवस्त्रे उतरून ठेवणारा हा महाराष्ट्राचा राजपुरूष २५ नोव्हेंबर, १९८४ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने अनंतात विलिन झाला. कृष्णा कोयनेच्या प्रितीसंगमावर त्यांच्या आवडत्या ठिकाणी सरकारी इतमामाने त्यांचा अंत्यविधी पार पडला.

सहा.प्रा. सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर
९९७५७५९३२५

Loading

One thought on “Yashwantrao Chavan: आधुनिक महाराष्ट्राचा ‘यशवंत’ वारसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *