
woamans Day
Woamans Day : ८ मार्च, १९०८ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात केलेल्या ऐतिहासिक निदर्शनाच्या स्मृतिप्रित्यर्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लारा झेटकिन या महिलेने १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत केला. तेव्हापासुन हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आज ८ मार्च या निमित्ताने आजपर्यत स्त्रियांनी केलेल्या कामगिरीचा व परिवर्तनाचा मांडलेला आलेख…

एकोणिसाव्या शतकातील वेगवेगळया राजकीय घडामोडीनंतर जे वैचारिक परिवर्तन झाले. त्यामुळे स्त्रीविषयक विचारांना चालना मिळाली. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा स्वतः आत्मपरिक्षणाचा, विचारमंथनाचा व प्रत्यक्ष कृतींच्या प्रारंभाचा काळ होता. तर उत्तरार्ध झपाटयाने होणारे अंतर्बाहय बदल स्वीकारण्याचा, प्रत्यक्ष चांगल्या-वाईट परिणामांचा, अंतर्गत समाधानाचा आणि स्त्रीचळवळींचा कालखंड होता. २१ व्या शतकात आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दिसतात. संगीत, नृत्य, अभिनय, साहित्य, विज्ञान, संगणक, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ व शिक्षण अशा सर्व क्षेत्रात आज स्त्रियांचे अस्तित्व व कर्तृत्व दिसून येते.
आज ही सकारात्मक परिस्थिती स्त्रियांच्या बाबतीत असली तरी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात स्त्रियांना कुटूंबात व समाजात मान होता. गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा यासारख्या विदुषीही त्या काळात निर्माण झाल्या. शिवकाळात जिजाऊंसारख्या राजमातांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे सुपूत्र घडविले. पेशवाईतसुध्दा स्त्रियांनी बरेच राजकारण केले. मोगलाईत स्त्रीचे स्वरूप भोगदासीचे होते. पण स्त्रिला महाराष्ट्रात एका बाजूला मान होता. पण इतके असूनही पुढे येऊन कार्य करण्याची मुभा मात्र नव्हती.
पण त्यानंतर महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर व महर्षि कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांमुळे महाराष्ट्रात स्त्रीशिक्षणाने जोर धरला.
जगातील पहिली स्त्री चळवळकर्ती मेरी वुलस्टोनक्राफ्टने आपल्या १७९२ ला प्रसिध्द झालेल्या ‘अ व्हिंडीकेशन ऑफ द राईटस ऑफ वुमन’ या पुस्तकात तिने स्त्रियांना अधिक चांगले शिक्षण मिळावे असे सांगितले. देशातील पहिल्या स्त्रीशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्याकडून शिक्षणाचे धडे गिरवले. अत्यंत कठीण व खडतर अवस्थेत तसेच सनातनी समाजाला तोंड देत त्यांनी १८४८ ला हुजूरपागेत मुलींची पहिली शाळा स्थापन करून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
19 व्या शतकानंतर पहिल्या महायुध्दाच्यावेळी अॅनी बेझंट या पाश्चात्य स्त्रीने हिंदी राजकारणात पहिल्यांदा पाऊल टाकुन १९१७ ला त्या काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. त्यानंतर त्यांनी ‘विमेन्स इंडियन असोसिएशन’ या नावाची राजकीय, सामाजिक व स्त्रियांच्या प्रमुख प्रश्नांना राष्ट्रपातळीवर चर्चा करावयास लावणारी एक संघटना तयार केली.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह यात दलित स्त्रीयाही मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. तसेच दुसरे महायुध्दकाळात व स्वातंत्र्योत्तर कालखंडात हैद्राबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन व गोवा मुक्ती आंदोलन अशा महत्त्वाच्या आंदोलनात म्हणजेच संपूर्ण भारतीय स्वातंत्र्य चळवळीस स्त्रियांनी खूप मोठा हातभार लावलेला दिसून येतो. वरील सर्व काळात स्त्रियांनी आत्मप्रेरणेने काम केल्याने जगाला स्त्रीक्षमतेची व स्त्रीशक्तीची जाणीव झाली. देशाची प्रगती साधावयाची असेल तर स्त्रियांना त्यात सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक प्रगती घडविली पाहिजे. हे विचार पुढे आल्याने स्त्रियांना पुढे येण्यासाठी वाव मिळाला व स्त्रीयांनीही यात गती घेतली.
शंभर वर्षापूर्वी घर सांभाळणे, मुलांना जन्म देणे, संगोपन करणे तसेच कौटूंबिक जबाबदाऱ्या निभावणे एवढेच तिचे कार्यक्षेत्र होते. पण आज स्त्रिया धार्मिक व सामाजिक नितीनियमांना, रूढीपरंपरांना मोडीत काढू लागल्या आहेत. स्त्रीचे कुटूंबातील स्थान व दर्जा आज उंचावला आहे. स्त्रीशिक्षणाच्या सार्वत्रिक प्रसारामुळे मध्यमवर्गीय स्त्री ही औपचारिक शिक्षणाचा लाभ घेऊ शकलेली आहे. सुरूवातीला साक्षर होण्याची जाणीव, घरगुती लिहिण्या-वाचण्याचे शिक्षण, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, व्यवसाय व उद्योगधंद्यांचे शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान अशा पायऱ्यांनी स्त्रीशिक्षणाचा विकास झालेला दिसतो.
हजारो वर्षाच्या रूढी व परंपरा मोडण्याचे सामर्थ्य त्यांच्यात त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे येऊ लागले. शिक्षणामुळे विचारपरिवर्तन, विचाराबरोबर आचारपरिवर्तन होऊन त्यांच्या परिवर्तनाच्या कक्षा हळूहळू रूंदावल्या व त्या आज अनेक क्षेत्रात व अनेक चळवळीत काम करू लागल्या. आज स्त्रिया शिक्षिका, नर्स, टायपिस्ट, स्वागतिका, सेक्रेटरी, टेलिफोन ऑपरेटर या नोकऱ्यांबरोबरच संशोधक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, पोलिस अधिकारी, व्यवस्थापक, उद्योजक अशा एरवी स्त्रियांना खुल्या नसणाऱ्या व स्पर्धात्मक जगात सत्ता हाती असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानावर स्त्रियांचा हळूहळू प्रवेश होऊ लागला. त्याचबरोबर महिला सबलीकरण व सक्षमीकरण होऊ लागलेले आहे .
आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. आशा, लता व उषा या मंगेशकर भगिनींनी गायन क्षेत्रात, मदर तेरेसा, मेधा पाटकर, अरूंधती रॉय, किरण बेदी यांचे सामाजिक कार्य, विभावरी शिरूरकर, दुर्गा भागवत, इंदिरा संत, शशी देशपांडे, शोभा डे, महादेवी वर्मा, सुभद्राकुमारी चौहान, अमृता प्रीतम, सुधा मुर्ती यांच्यासारख्या लेखिकांचे साहित्य क्षेत्रातील योगदान, इदिरा गांधी, सोनिया गांधी, प्रतिभाताई पाटील, सुषमा स्वराज, मायावती, जय ललिता, ममता यांचे राजकारणातील योगदान, इंद्रा नुयी, वीणा पाटील यासारख्या व्यवस्थापिका, सायना नेहवाल पी. टी. उषा, कर्नाम मल्लेश्वरी, सानिया मिर्झा, अंजू जॉर्ज, तेजस्वीनी सावंत, अंजली वेदपाठक यासारख्या महिला खेळाडू या सगळ्यांकडे पाहिले की, महिलांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची कल्पना आपणास येते.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतही स्त्रियांना आज समान अधिकार देण्यात आलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षाचा आढावा घेतल्यास आपणास असे दिसते की, एकपत्नीत्वचा कायदा, घटस्फोटाची मुभा, हुंडाबळी तसेच वारसा दत्तक-पोटगी अधिकार इत्यादी अनेक कायद्यांनी स्त्रियांचा कौटूबिक आणि सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री-स्वातंत्र्य स्त्रियांचे समान हक्क, अधिकार, स्त्रीमुक्ती, स्त्रीचळवळ हे शब्द खरे तर विसाव्या शतकातील होते. आज एकविसाव्या शतकात स्त्रीला या सर्व गोष्टींची सजगतेने माहिती झालेली आहे. सद्यस्थितीत स्त्रीला पुरुषाइतकाच अधिकार आहे, तिच्या क्षमतांना, सुप्त गुणांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, तिला तिची ओळख पटवून द्यायला हवी.
याबरोबरच स्त्रियांच्या मुख्य प्रश्नांकडे लक्ष आता वेधले जाऊ लागले आहे.
आज ३३ टक्यावरून ५० टक्यापर्यंत स्त्रियांना आरक्षण संसदेत दिले असले तरी आजही ग्रामीण भागात अंधश्रध्दा, उपास-तापास, व्रतवैकल्ये, पूजा-अर्चा यासारख्या पारंपारिक कचाटयात ती. अडकलेली दिसते आहे. निरक्षरता, स्त्री-भ्रूण हत्या, लैंगिक छळ, हुंडाबळी याचबरोबर स्त्रियांचे फार मोठया प्रमाणात होणारे बाजारीकरण, स्त्रीसौंदर्याचे प्रदर्शन तसेच पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी ती आज बळी पडलेली दिसते.
आज ती आपल्या अंगभूत गुणांनी धडाडीने नवनवीन क्षेत्रे पादाक्रांत करत आहे. त्यासाठी पुरूषांचा सहभाग, प्रोत्साहन आवश्यक आहे. कारण बाहेरील जगात स्त्रीने कितीही कर्तृत्व जरी दाखवले तरी कुटुंबाची, मुलांची जबाबदारी तिच्यावरच येते. निसर्गानेही आणखी एक महत्वाची जवाबदारी तिच्यावरच टाकलेली आहे. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडुन व पेलुन तिला आपली प्रगती करून घ्यावयाची आहे. पालकांनी मुलींना खूप शिकवून स्वतःच्या पायावर त्यांना उभे केले पाहिजे. तरच स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची ज्योत महिलांच्या मनामनात उजळून तिची पुढील वाटचाल सुकर होईल. याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा.
सहा.प्रा. सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय,
देऊर
९९७५७५९३२५
