स्त्री-पुरुष समानतेसाठी सावित्रीबाईचा संघर्ष प्रेरणादायी : डॉ. सविता गिरे-पाटील

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी उपक्रम
सातारा/ प्रतिनिधी
श्री मुधाईदेवी शिक्षणसंस्था संचालित प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे अंतर्गत तक्रार समिती, सांस्कृतिक विभाग व समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व भित्तीपत्रकाचे उद्घाटनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सत्कार प्राध्यापक डॉ. अशोक शेलार यांनी केले.
सावित्रीबाई फुले जयंती व्याख्यान कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून दादासाहेब ज्योतीराम गोडसे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वडूज (ता. खटाव, जि. सातारा) येथील समाजशास्त्र विभागप्रमुख मा. डॉ. सविता गिरे-पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या व्याख्यानातून सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि स्त्रीमुक्तीच्या क्रांतिकारक कार्याचा सखोल आढावा घेतला. “सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळात अधिक प्रासंगिक असून स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. माधुरी शिंदे होत्या. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव, समता व मानवतावादी मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वागत आणि प्रा. डॉ. अशोक शेलार यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संध्या पौडमल यांनी केले.
या कार्यक्रमास डॉ. दत्तात्रय ओवाळे, डॉ. चंद्रशेखर भारती, प्राध्यापकवृंद तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





