
भारतीय भाषा दिनानिमित्त कार्यक्रम
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथे मराठी भाषा व वाड्मय मंडळ, हिंदी व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित भारतीय भाषा दिनाच्या कार्यक्रमांतर्गत विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. लक्ष्मण थोरात व मा. श्री. ऋषिकेश मोरे, यिन समन्वयक, दै. सकाळ माध्यम समूह, सातारा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक शेलार यांनी केले.
ऋषिकेश मोरे यांनी “भारतीय भाषांचे संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांचे स्थान” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भारतीय भाषामध्ये लेखन आणि संवाद साधण्याचे महत्व पटवून दिले. प्रमुख पाहुणे प्रा. लक्ष्मण थोरात यांनी भारतीय भाषांच्या महत्वावर प्रकाश टाकत, भाषेच्या संवर्धनातील युवकांची भूमिका स्पष्ट केली. भाषा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयानुषंगाने विविध भाषिक कौशल्यांचे व भाषिक समृद्धीचे जीवनातील महत्त्व सांगून विध्यार्थानी मातृभाषेसह विविध भाषा प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्यात असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाषा आणि संस्कृती यांच्यातील परस्पर अन्वय स्पष्ट करून विद्यार्थ्यांना भाषा संवर्धन व भाषा समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
भारतीय भाषा दिनाच्या निमित्ताने “माझी भाषा माझी स्वाक्षरी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून स्वाक्षरी करून हा उपक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे पाहुणे परिचय व स्वागत डॉ. शिवाजी चवरे यांनी सूत्रसंचालन सहा.प्रा. दत्तू मेंगाळ यानी तर आभार प्रदर्शन डॉ. उत्तम आळतेकर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.







