T20 world cup final भारत विश्वविजेता- टी-२० विश्वचषकावर टीम इंडियाचे नाव

T20 world cup final – तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश
अंतिम सामन्यात न्यूजीलँडचा ९ ६ धावांनी पराभव
अहमदाबाद/ प्रतिनिधी
T20 world cup final भारत विश्वविजेता- टी-२० विश्वचषकावर टीम इंडियाचे नाव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या ऐतिहासिक टी२० विश्वचषक फायनलमध्ये भारतीय फलंदाजांनी धावांचा जणू पाऊस पाडला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा विश्वविक्रमी डोंगर उभा केला असून, न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावांचे अत्यंत कठीण लक्ष्य ठेवले आहे. तर उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करीत किवीजला धावत ऑल आऊट करीत धावांनी पराभूत करीत टी-२० विश्वचषकावर टीम इंडियाचे नाव कोरले.
तत्पूर्वी भारतने पहिल्यांदा फलदांजी करीत डावाची सुरुवात केली. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी अत्यंत स्फोटक पद्धतीने केली. अभिषेकने सुरुवातीपासूनच किवी गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत अवघ्या २१ चेंडूंत ५२ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने संजू सॅमसनसोबत पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४६ चेंडूंत ९८ धावांची भागीदारी करून भारताला रॉकेट गती दिली. अभिषेक बाद झाल्यानंतरही संजू सॅमसनने आपला आक्रमक पवित्रा कायम राखला. सॅमसनने मैदानाच्या चारी बाजूंना ८ उत्तुंग षटकार खेचत ४६ चेंडूंत ८९ धावांची क्लासिक खेळी केली, जी या अंतिम सामन्याचा मुख्य आकर्षण ठरली.
मधल्या फळीत इशान किशनने सॅमसनला उत्तम साथ दिली. इशानने आपल्या नैसर्गिक शैलीत फटकेबाजी करत २५ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५४ धावांचे योगदान दिले. डावाच्या १७ व्या षटकात न्यूझीलंडच्या जिमी नीशमने एकाच षटकात सॅमसन, किशन आणि सूर्यकुमार यादव (०) यांना बाद करून भारताची धावगती रोखण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पंड्यानेही १३ चेंडूंत १८ धावांची छोटेखानी खेळी केली, पण तो मोक्याच्या वेळी बाद झाला.
मात्र, डावाच्या अखेरच्या टप्प्यात शिवम दुबेने मैदानावर वादळ निर्माण केले. दुबेने शेवटच्या षटकात जिमी नीशमची धुलाई करत ३ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याने अवघ्या ८ चेंडूंत नाबाद २६ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताने २५० चा टप्पा ओलांडला. तिलक वर्मा ६ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून जिमी नीशमने सर्वाधिक ३ बळी घेतले असले तरी त्याने ४६ धावा मोजल्या. भारताने रचलेली ही धावसंख्या विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या असून, आता संपूर्ण मदार भारतीय गोलंदाजांवर आहे.
भारताने २० ओव्हरमध्ये २५५ धाव करीत न्यूझीलंडला २५६ धावांचे लक्ष्य ठेवले त्यामुळे किवीजचा संघ हा धावांचा डोंगर कसा पार करणार याकडे लक्ष राहिले.
२५६ धावांच्या या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डावाची अवस्था सुरुवातीपासूनच बिकट झाली. भारतीय गोलंदाजांनी आज गोलंदाजी नाही, तर ‘तोफखाना’ डागल्यासारखी कामगिरी केली. विशेषतः जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक स्पेलमध्ये ४ बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणाच मोडला. त्याने रचिन रवींद्र (१), मिचेल सँटनर (४३), जेम्स नीशम (८) आणि मॅट हेन्री (०) यांना तंबूत धाडले. दुसऱ्या बाजूने फिरकीपटू अक्षर पटेलने आपली जादू दाखवत ३ फलंदाजांना बाद केले आणि धावगतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. यष्टीरक्षक इशान किशनने यष्टींमागे चपळता दाखवत एकूण ४ झेल टिपले.
न्यूझीलंडकडून केवळ टीम सायफर्टने ५२ धावांचा एकाकी लढा दिला, पण वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करून भारताचा विजय निश्चित केला. १७.३ षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडची अवस्था ९ बाद १५२ अशी झाली होती. भारताच्या या शिस्तबद्ध आणि आक्रमक कामगिरीमुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला अखेर १९ व्या वरच्या शेवटी डॅफीचा झेलने किवीजला १५९ मध्ये ऑल आऊट केले भारताने हा सामना एकतर्फी जिंकून अहमदाबादच्या मैदानावर विजयाचा तिरंगा फडकवला आहे.तिसऱ्यांदा भारताने टी-२० विश्वचषकावर टीम इंडियाचे नाव कोरले तेही मायभूमी भारताच्या मैदानात आज पुन्हा भारत विश्वविजेता बनला.
भारताने हा सामना दणदणीत फरकाने जिंकून पुन्हा एकदा जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. संपूर्ण स्टेडियममध्ये ‘इंडिया-इंडिया’चा जयघोष सुरू असून खेळाडूंनी तिरंगा हाती घेऊन मैदानावर एकच जल्लोष केला आहे.
IndiaVsNZ #WorldCupWinners #SamsonPower #BumrahTheGoat #VictoryParade





