Satara Zp Election :सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा ‘एकहाती’ वरचष्मा, ‘बालेकिल्ल्या’ला भगदाड आणि साताऱ्याच्या राजकारणात काय होणार ?

प्रकाश राजे/ महाराष्ट्र वन वृत्तसेवा
Satara Zp Election :सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीने जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून असलेल्या राष्ट्रवादीच्या एकहाती वर्चस्वाला मोठा तडा दिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि आता चारही सभापती पदांवर भारतीय जनता पक्षाने ताबा मिळवल्याने, साताऱ्यात आता ‘भाजप विरुद्ध इतर सर्व’ असे नवे राजकीय ‘मॉडेल’ आकाराला आले आहे. या विजयामुळे ना. जयकुमार गोरे आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांचे जिल्ह्यातील वजन कमालीचे वाढले असून, ‘माण ते खंडाळा’ आणि ‘कराड ते फलटण’ या पट्ट्यात भाजपची पकड आता अधिक घट्ट झाली आहे.
महायुतीमधील ‘अँतर्गत कलह’ आणि ‘देसाई-पाटील’ जोडीला शह – राज्यात जरी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र असले, तरी साताऱ्यात मात्र या निवडीने त्यांच्यातील दरी रुंदावली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार मकरंद पाटील यांना त्यांच्याच जिल्ह्यात भाजपने दिलेला हा शह आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा मोठा पेच निर्माण करणारा ठरणार आहे. भाजप ज्या पद्धतीने मित्रपक्षांचे सदस्य फोडून सत्ता मिळवत आहे, त्यावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे पुढील पाच वर्षात पूर्ण बदलणार आहेत.
कोरेगावात आमदार महेश शिंदेचा मास्टरस्ट्रोक : जिल्ह्याच्या राजकारणावर होणारा सर्वात मोठा परिणाम म्हणजे स्थानिक पातळीवरील कट्टर राजकीय शत्रूत्व आता अधिक टोकदार होणार आहे.आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या या गणितात आपली ताकद दाखवून देत पत्नी प्रियाताई शिंदे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वर्णी लावली यामुळे कोरेगाव – खटाव मतदारसंघात शशिकांत शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सभापती निवडीत महेश शिंदेंनी केलेली फिल्डिंग शशिकांत शिंदेंच्या राष्ट्रवादीसाठी (शरद पवार गट) आता धोक्याची घंटा मानली जात आहे.
सातारा जावळी एकहाती शिवेंद्रराजेंच्या सोबत : सातारा जिल्हा परिषदेची ही सत्ता भाजपची असली, तरी त्यातील ‘शिवेंद्रराजेंचा पॅटर्न’ हा खूप प्रभावी आहे. त्यांनी आपल्या शांत पण धोरणी राजकारणातून साताऱ्याचे राजकारण पुन्हा एकदा आपल्या बाजूने वळवले आहे. या विजयामुळे येणाऱ्या विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दमदार काम केले त्याचीच पुनरावृत्ती झेडपी केली कट्टर सहकारी राजूभैय्या भोसले यांना उपाध्यक्ष करीत मुत्सद्दीपणाची चुणुक दाखवली त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिहराजे भोसले हेच सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वात मोठे ‘पॉवर सेंटर’ म्हणून काम करतील हे स्पष्ट आहे.
माण-खटाव मध्ये जयकुमार गोरेंचा प्रभावी अंमल: या सभापती निवडीचे सर्वात मोठे फलित म्हणजे आमदार जयकुमार गोरे यांनी माण आणि खटाव तालुक्यात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी माणच्या प्रिया शिंदे यांची निवड झाल्यानंतर, आता सभापती पदांच्या वाटपातही या भागाला झुकते माप मिळाले आहे. यामुळे माण-खटावमधील विकासकामांचा निधी पूर्णपणे जयकुमार गोरेंच्या नियंत्रणात राहील. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रभाकर देशमुख आणि इतर स्थानिक नेत्यांसमोर आता आपल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जयकुमार गोरेंनी या माध्यमातून मोठी रसद आणि रान तयार केले आहे.
मंत्री मकरंद पाटलांच्या वर्चस्वाला थेट आव्हान :सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत भाजपने केवळ खटाव किंवा कोरेगाववरच लक्ष केंद्रित केले नाही, तर आमदार मकरंद पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या वाई तालुक्यातही मोठे खिंडार पाडले आहे. ऋतुजा विराज शिंदे यांची सभापती पदी झालेली निवड ही मकरंद पाटील यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या खूप मोठा फटका मानला जात आहे. वाई विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. या निवडीमुळे वाई तालुक्याच्या राजकारणात आणि विशेषतः मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. वाईच्या राजकारणात ‘पॅटर्न’ बदलला आहे. ऋतुजा शिंदे यांच्या पतीचे (विराज शिंदे) सक्रिय सहकार्य आणि भाजपची रणनीती यामुळे मकरंद पाटलांच्या वर्चस्वाला थेट आव्हान मिळाले आहे.
फलटणला रणजितसिंह निंबाळकरांचे वर्चस्व वाढणार :भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या निवडीमागचे प्रमुख सूत्रधार मानले जात आहेत. त्यांनी फलटण तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. आमदारकी, नगरपालिका पाठोपाठ पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी त्यांची विजयी आगेकूच सुरूच आहे त्यामुळे त्यांचे वर्चस्व वाढणार आहे. सहाजिकच राजकीय कोंडी रोखण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांना आता फलटणच्या ग्रामीण भागात भाजपच्या या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सभापती पद आपल्या हातात असल्यामुळे, भाजप आता फलटणच्या विकासनिधीवर (डीपीडीसी आणि जिल्हा परिषद सेस) भाजप आपला प्रभाव पाडणार, हे निश्चित आहे.
कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील विरुद्ध आमदार मनोज घोरपडे हा संघर्ष आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नव्या वळणावर आला आहे. आमदार मनोज घोरपडे यांनी भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत मिळवलेली पकड बाळासाहेब पाटलांच्या पारंपरिक वर्चस्वाला धक्का देणारी ठरत आहे. त्यात आता माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या घरात सभापतीपद दिले गेल्याने धैर्यशील कदम यांच्या कामाची दाखल भाजपने घेत दुसरीकडे आमदार मनोज घोरपडे यांचे हात बळकट केले आहेत. व कराड उत्तरेच्या मतविभाजणीच्या समस्येवर उत्तर शोधले आहे.
राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई शरद पवार आणि अजित पवार अशा दोन गटांत विभागल्या गेलेल्या राष्ट्रवादीसाठी हा निकाल मोठा धक्का आहे. महत्त्वाचे सदस्य फुटल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल खचले असून, ग्रामीण भागातील संपर्क यंत्रणा कमकुवत होण्याची भीती आहे. सभापती निवडीत ज्या पद्धतीने ‘गुप्त युती’ आणि ‘फोडाफोडी’ झाली, त्याचे प्रतिबिंब आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच उमटेल. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील आता भाजपला रोखण्यासाठी काय पावले उचलणार, भाजपला रोखण्यासाठी ‘राजकीय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाने भाजप विरोधी सर्व गटांना एकत्र आणण्यात त्यांना कितपत यश येणार यावर बरीच लढाई अवलंबून आहे.
विकासनिधी आणि वर्चस्ववादाचा नवा अध्याय सभापती पदे भाजपच्या ताब्यात गेल्यामुळे आता जिल्ह्याचा ‘डीपीडीसी’ (DPDC) निधी आणि जिल्हा परिषदेचा सेस फंड कोणत्या तालुक्यांत जाणार, यावरून नवा वाद रंगणार आहे. सत्ताधारी भाजप आपल्याच बालेकिल्ल्यात जास्त निधी वळवण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे इतर तालुक्यांतील लोकप्रतिनिधी अधिक आक्रमक होतील.
साताऱ्याचे राजकारण आता केवळ सत्तेसाठी नसून ‘अस्तित्वासाठी’ सुरू झाले आहे. एका बाजूला भाजपचे वाढते वर्चस्व आणि दुसरीकडे दुखावलेले शंभूराज देसाई, मकरंद पाटील व बाळासाहेब पाटील यांची युती, यामुळे आगामी काळ हा अत्यंत संघर्षाचा आणि राजकीय धक्कातंत्राचा असणार आहे. हा संघर्ष येणाऱ्या काळात अधिक कायदेशीर लढाईकडे किंवा टोकाच्या राजकीय विरोधाकडे झुकण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.






