संसार ही केवळ एक ‘धर्मशाळा’; मनुष्य इथे मालक नाही तर फक्त पाहुणा – आचार्य श्री राजरक्षितसूरि

देऊर येथील जैन संघात प्रवचन सेवा संपन्न
महाराष्ट्र वन वृत्तसेवा: देऊर (ता.कोरेगाव ) येथील श्री गोडी पार्श्वनाथ जिनालय जैन संघात आचार्य श्री राजरक्षितसूरि आणि पं. नयरक्षितविजय महाराज यांचे मंगल आगमन झाले. त्यांच्या विहार यात्रेत पुणे, कोरेगाव आणि वाठार येथील युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. यावेळी झालेल्या प्रवचनात आचार्य श्रींनी मानवी जीवनाचे नश्वरत्व आणि सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीवर मार्मिक भाष्य केले. यावेळी भाविक बहुसंख्यने उपस्थित होते.
संसाराचे नश्वरत्व आणि स्वप्नवत आयुष्य: आचार्य श्रींनी सांगितले की, ज्याप्रमाणे डोळे उघडताच स्वप्न संपते, त्याचप्रमाणे मृत्यूसमयी डोळे मिटताच हा वैभवशाली संसारही संपतो. माणूस ज्या संपत्तीसाठी आयुष्यभर धावतो, ती गाडी, दागिने आणि पैसा अखेर गॅरेज, तिजोरी आणि लॉकरमध्येच राहतात. मृत्यूच्या वाटेवर नातेवाईक आणि देहही साथ सोडतात, हे वास्तव प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

पैशाच्या नादात हरवलेले आरोग्य: आजच्या जीवनशैलीवर टीका करताना ते म्हणाले की, “हाय पैसा… हाय पैसा…” करण्याच्या नादात माणसाने स्वतःचे आरोग्य गमावले आहे. खाण्यापिण्याची शिस्त आणि झोप हरवल्यामुळे शरीरात मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि नैराश्यासारखे आजार बळावले आहेत. आयुष्यभर कष्ट करून जो पैसा कमावला, तोच आता शरीर सुधारण्यासाठी खर्च करावा लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे.
धर्मशाळेसारखा प्रवास: मानवी जीवन हे ७०-८० वर्षांचा एक प्रवास असून हा संसार एका धर्मशाळेसारखा आहे. आपण येथे मालक म्हणून नाही, तर केवळ पाहुणे आणि प्रवासी म्हणून आलो आहोत, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. तर जीवन सार्थकी लागेल.





