guru purnima
guru purnima भारतीय गुरुपरंपरेचे अतुल्य महत्व, जाणून घ्या विशेष लेखातून
guru purnima :गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। या ओळीतच गुरूची महती आपल्या लक्षात येते. भारतात प्राचीन काळापासून गुरू-शिष्य परंपरा आहे. प्राचीन काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरूगृही ज्ञानसंपादनासाठी आश्रमात राहत असत. ज्ञानप्राप्ती नंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. अलीकडच्या काळात मात्र गुरूकुल परंपरा कमी झाली आहे. मात्र गुरूकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे.
जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरूकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. गुरूपौर्णिमा तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. या वर्षी गुरूपौर्णिमा १० जुलै रोजी असून अनेक ठिकाणी ती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाणार आहे. या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूपौर्णिमेची माहिती आपण पाहणार आहोत.
भारतीय परंपरेत कृष्ण-अर्जुन, अर्जून-द्रोणाचार्य,एकलव्य-द्रोणाचार्य, चाणक्य-चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. त्यानंतर राजमाता जिजाबाई- छत्रपती शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद आणि अलीकडच्या काळातील सचिन तेंडूलकर-रमाकांत आचरेकर सर अशी गुरू शिष्य परंपरा आपल्याला पहायला मिळते. अशा या गुरू-शिष्य परंपरा जपणारा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा. कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर मांडले. भारतीय संस्कृतीमधील आद्यगुरू व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहून धर्मशास्त्र, नितीशास्त्र, मानसशास्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन संपूर्ण मानवजातीला घडवले. घडते. तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्ध यांनी सारनाथ येथे त्यांच्या पहिल्या पाच शिष्यांना दिलेला पहिला उपदेश किंवा प्रवचन याच गुरू पौर्णिमेच्या दिवशी दिले असे मानले जाते, त्यामुळे बौद्ध धर्मात या दिवसाला विशेष महत्व आहे. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. शाळा, विद्यालय महाविद्यालय, व्यवसाय क्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य आपल्या जीवनात यशस्वी होतात. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. आयुष्यात चांगला गुरू मिळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. कारण ज्याच्या आयुष्यात गुरू असतो त्याला त्याच्या गुरूकडून जीवनात चांगल्या वाईट सर्वच गोष्टींना सामोरे जाण्याचे आत्मबळ मिळत असते.
आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेतात आणि गुरुही त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देतात. धार्मिक ग्रंथानुसार हजारो वर्षांपूर्वी महर्षी वेद व्यासांनी आषाढ महिना गुरुपौर्णिमा उत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. महर्षी व्यास यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषीमुनींना श्रीमद भागवत पुराणाचे ज्ञान दिले होते, असे म्हणतात. तेव्हापासून महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली, जी आजही पाळली जाते.
गुरूपौर्णिमा guru purnima या शब्दाचा अर्थ गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश असा होतो. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने शिष्याचे जीवन प्रकाशमय होते. हा दिवस गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. आपल्या आयुष्यातील पहिला गुरू म्हणजे आई असते आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या आईकडून घेतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते. आईप्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपली गुरू असतात. गुरू अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असल्याने भारतात गुरूपौर्णिमा श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.
guru purnima गुरूपौर्णिमेला गुरूपूजन करण्याची म्हणजेच गुरूच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणे होय. गुरूपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने आपल्याला दिलेले ज्ञान आत्मसात करून ते ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे हा होय. गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरूबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरूपूजन. अशा प्रकारच्या गुरूपूजनातून गुरूला खरी गुरूदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरूला खरा आनंद आणि समाधान होत असते. खऱ्या गुरूसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो.
आई, वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरू तेच असतात जे शिष्याला त्याचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हे गुरूचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरूकडे असली पाहिजे. शिष्याला जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूलादेखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूनेदेखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे.
जो शिष्य आपल्या गुरूकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्विकारतो त्या शिष्याला गुरूकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. ज्ञान ग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा असायला हवा. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्य अंहकारी असेल तर अडथळा निर्माण होतो. यासाठीच शिष्याची गुरूवर मनापासून श्रद्धा असायला हवी. त्याचसोबत गुरूकडून मिळवलेले ज्ञान शिष्याने आपल्या जीवनात आचरणात आणले पाहिजे, तरच त्याची प्रगती होत जाते.
guru purnima एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचे रुप समजले जाते. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचे सांगितले जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी शिष्य आपली कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंजणांना, शिक्षकांना, मार्गदर्शकांना, आध्यात्मिक गुरूंना आदराने भेटवस्तू देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात.
guru purnima अलीकडच्या आधुनिक जीवनात गुरुचे महत्व अनमोल असून गुरु किंवा शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवतात, त्यांच्या ज्ञानाने शिष्यांना ते समृद्ध करतात आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यास मदत करतात. गुरु हे फक्त ज्ञानाचे स्त्रोत नाहीत, तर ते आपल्या आध्यात्मिक आणि नैतिक विकासासाठी मार्गदर्शन करतात. गुरु आपल्याला ज्ञानाने शिष्याचे आयुष्य परिपूर्ण करतात आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत करतात. ते आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव करून देतात आणि ध्येय निश्चित करण्यासाठी मार्गदर्शन करतात.
गुरु आपल्याला योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यातील फरक शिकवून आपल्यातील आत्मविश्वास वाढवतात आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्यास मदत करतात. त्यामुळे आपण नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम बनतो. आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी गुरु आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. म्हणजेच गुरु हे आपल्यासाठी एक प्रेरणास्थान असतात. कारण ते आपल्याला नेहमी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. गुरु आपल्याला शिस्तप्रिय बनवतात आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी शिकवतात.
गुरु आपल्याला समाजासाठी विधायक गोष्टी करण्याची प्रेरणा देतात आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतात. अलीकडच्या आधुनिक जगात गुरुचे महत्व अनन्यसाधारण असून आजच्या धावपळीच्या जीवनात, आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते. ते आपल्याला योग्य दिशा दाखवून जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करतात. गुरु केवळ शाळेतील शिक्षकच नसतात, तर ते आई-वडील, पत्नी, मित्र, किंवा असे कोणीही असू शकतात. असे हे गुरु आपल्याला ज्ञानाने, नैतिकतेने आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण करतात.
म्हणूनच या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरुजनांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. GuruPournima special

लेखन – सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव, गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
९९७५७५९३२५







