
साताऱ्यात मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख वित्तीय समावेशन अध्यासनाच्या वतीने आयोजित विशेष मार्गदर्शन वर्गात आरबीएल बँकेचे वाइस प्रेसिडेंट श्री. दिगंबर सूर्यवंशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील उपयोगांवर प्रकाश टाकला. विद्यापीठाच्या वाणिज्य व बँकिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित या मार्गदर्शन वर्गात श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे आधुनिक काळातील महत्त्वाचे तंत्रज्ञान असून, बँकिंग क्षेत्रात ग्राहक सेवा, व्यवहारांचे व्यवस्थापन, व फसवणूक रोखण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. भविष्यात बँकिंग सेवा अधिकाधिक स्वयंचलित व डिजिटल स्वरूपाच्या होणार असून, रोजगाराच्या संधींमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. कार्यक्रमात श्री. सूर्यवंशी यांनी सुचवले की, विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील विशेष अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील व्यवहार अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून त्याचा आर्थिक व्यवस्थापनावर सकारात्मक परिणाम होईल. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात सुरू असलेल्या स्टॉक मार्केट लॅबोरेटरी, मॉक बँक, व बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना क्षेत्रातील रोजगार संधी अधिक सहज उपलब्ध होत आहेत. आता येथून पुढील काळात वाणिज्य व बँकिंग चं विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आधारित कोर्सेस देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी सांगितले की, विद्यापीठातील सर सी.डी. देशमुख अध्यासनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वित्तीय जागरूकता वाढवणे व विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्यांशी जोडणे.
कर्मवीर विद्यापीठाच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याबरोबरच समाजातील विविध घटकांपर्यंत वित्तीय जागरूकता पोहोचवण्याचे काम चालू आहे. कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी सांगितले की, या अध्यासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी संशोधन व प्रगत माहितीची दारे उघडली जातील असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. विजय कुंभार, विद्यापीठाचे कुलसचिव, यांनी सांगितले की, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी यांच्या कल्पकतेतून रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुरू आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी जागतिक तंत्रज्ञान प्रवाहाशी जुळवून घेत आहेत या उपक्रमास अनुसरून कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील वापर यावर विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय कुंभार यांनी केले, तर प्रमुख वक्त्यांची ओळख डॉ. राजशेखर निल्लोलू यांनी करून दिली. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. विजय पाटील व प्रा. रोहिणी भोसले यांनी केले. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
Artificial Intelligence