ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक असा प्रेरणादायी प्रवास
पळशी (ता.कोरेगाव) येथील सुपुत्र व व खडकी (पुणे) येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी सेवारत असलेल्या शैलेश उद्धवराव गायकवाड यांची मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. पोलीस दलात आपल्या दमदार आणि कार्यकुशल कामगिरीच्यामुळे त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सुरुवातीला त्यांनी चिपळूण तालुक्यात ग्रामसेवक म्हणून पाच वर्षे सेवा बजावली होती याच दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या मध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली होती. आता त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने ग्रामसेवक ते पोलीस निरीक्षक अशा प्रेरणादायी प्रवासाचे कौतुक होत आहे.
शैलेश गायकवाड यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी हे आहे. दुष्काळी भागातील पळशी सारख्या छोट्या गावातून प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली, प्राथमिक शिक्षण पळशी येथे तर माध्यमिक शिक्षण देऊरला झाले. पुढे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय फलटण तर वरिष्ट महाविद्यालय शिक्षण कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात पूर्ण केले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी एकता मंचच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला कोकणातील चिपळूण तालुक्यात पाच वर्ष ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली यावेळी ग्रामविकासाच्या विविध योजनात त्यांनी सक्रिय सहभाग देत गावांच्या विकासात भरीव कामगीरी केली होती. आजही त्यांनी सेवा बाजवलेल्या गावाचे ग्रामस्थ शैलेश गायकवाड यांच्या कामगिरीची आठवण काढतात व मार्गदर्शन घेतात हे विशेष .
पुढे जिद्द व मेहनतीच्या जोरावर २०१० मध्ये त्यांनी पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. पोलीस दलाच्या १०३ बॅच अधिकारी असलेल्या शैलेश गायकवाड यांनी सर्वप्रथम मुंबई कुर्ला येथे उपनिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर पुणे येथे नागरी हक्क संरक्षण विभागात उल्लेखनीय केले. पुढे नागपूर येथील तहसील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत झाले. याठिकाणीही सर्वोत्तम कामगिरीचा ठसा उमटवला येथे केंद्रीय ग्रह विभागाच्या बेस्ट पोलीस स्टेशन सर्वेक्षणात तहसील पोलीस ठाणे महाराष्ट्रात पहिले येण्याचा बहुमान पटकावला. पुढे पुणे आर्थिक गुन्हे शाखा येथे सेवा बजावल्या नंतर त्यांची नेमणूक पुणे खडकी येथे झाली होती. पोलीस दलात प्रशंसनीय व लोकोपयोगी कामगिरीच्या जोरावर त्यांनी वेगळा ठसा उमठवला आहे याकाळात अनेक सन्मानांनी त्यांना वेळोवेळी गौरवण्यात आले. नुकतीच त्यांची मुंबई येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पळशी व देऊर ग्रांमस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.