Headlines

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ

ajit pawar,

महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आज पुन्हा एकदा महाराष्ट्र राजकीय भूकंपाने हादरला. काल पर्यंत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार यांनी तीस पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे- फडणवीस सरकारसोबत नवी युती करीत आज अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तीस हुन अधिक आमदार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सुरुवातीपासून राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांचे विश्वासू सहकारी राहिलेले प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ असे पक्षाचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या सोबतीला गेल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली.

राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ (MAHARASHTRA POLITICS)

राष्ट्र्वादीतील दिग्गज नेत्यांसह भाजपा शिंदे सरकारशी हातमिळवणी करीत अजित पवार यांनी आज दुपारी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, श्रीमती आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या तीसहुन अधिक आमदार असल्याचे तर्क लावले जात आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याच्या वारंवार बातम्या माध्यमामधून येत होत्या मात्र स्वतः अजित पवार यांनी वेळोवेळी अशा बातम्यांचे खंडन केले. मात्र राजकीय जाणकारांना असलेली ती शक्यता आज खरी ठरली. शिवसेना पक्षात ज्या पद्धतीने गेल्यावर्षी फूट पडली व एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांना घेऊन नवीन शिंदे-फडणवीस सरकार अस्त्तित्वात आले त्याची पुनरावृत्ती आज पुन्हा महाराष्ट्राला पाहायला मिळाली.

राष्ट्रवादी फोडण्याचे प्रयत्न भाजपा ऑपरेशन कमळ च्या माध्यमातून करीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते अखेर आज अजित दादा सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादीमध्ये राजकीय भूकंप झाला. तर भाजपचे ऑपरेशन कमळ यशस्वी झाले. पक्षातील तीसहुन अधिक आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली तसे पत्र राज्यपालांना दिले आहे, फुटीचा सामना राष्ट्रवादीला करावा लागल्याने दिवसभर राजकीय चर्चाना उधाण आले, राष्ट्रवादीची पुढची रणनीती काय असेल, शरद पवार यांची भूमिका काय राहणार, महाविकास आघाडीचे भवितव्य काय असणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील राजकीय घटनाक्रम काय असेल यावर अवलंबून असतील.

म्हणून अजित दादांसोबतच्या आठ सहकारी आमदारांचाही लागलीच शपथविधी, भाजपकडून खबरदारी

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी हातमिळवणी करीत पहाटेच्या वेळी शपथविधी उरकून राज्यात खळबळ उडवून दिली होती, त्यावेळी तयार तयार झालेले सरकार औट घटकेचे ठरले कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपत्कालीन स्ट्रॅटिजी वापरून अजित पवार यांचे तथाकथित बंड मोडीत काढले , त्यामुळे अजित दादासोबत गेलेले आमदार पुन्हा माघारी फिरले, त्यावेळी फक्त एकट्या अजित पवार यांनी शपथ घेतली होती यावेळी अशी चूक टाळत भाजपाने सॊबत आलेल्या आमदारांपैकी आठ आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ लागलीच देत खबरदारी घेत सेफ गेम खेळाला असल्याचे स्पष्ठ झाले.

पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही, .- शरद पवार (sharad pawar, MAHARASHTRA POLITICS)

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी होतं. त्या वक्तव्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि सिंचन विभागात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. यामध्ये प्रधानमंत्र्यांनी जो आरोप केला, त्यानंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त करण्यात आले त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे.

आमच्या काही सहकाऱ्यांनी जी पक्षाची भूमिका आहे त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. पक्षाच्या संघटनात्मक बदलाचा विचार करण्यासाठी ६ जुलै रोजी पक्ष कार्यालात मी बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. विधीमंडळातील काही सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. याचे कारण यापैकी काही सदस्यांनी आम्ही सही केली असली तरी आमची वेगळी भूमिका कायम आहे असे मला सांगितले. याबाबत माझ्याशी संपर्क केलेल्या सहकाऱ्यांनी जनतेपुढे हे चित्र मांडले तर त्यांच्याबद्दल माझा विश्वास बसेल जर त्यांनी मांडले नाही तर त्यांची वेगळी भूमिका आहे, असा निष्कर्ष मी काढेल. असे मत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न राहीला तर आजचा प्रकार इतरांना नवीन असेल मात्र मला नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते त्यापैकी महिन्याभराने सहा आमदारांच्या व्यतिरीक्त सगळे आमदार सोडून गेले. माझ्यासहीत पाच आमदारांना सोबत घेऊन मी पुन्हा पक्षाची बांधणी केली. पुढच्या निवडणूकीत जे आम्हाला सोडून गेले त्यापैकी दोन-तीन जण सोडल्यास सगळे पराभूत झाले. १९८० साली जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहील. माझा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर आणि विशेषत: तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राष्ट्र्वादीसोबत आल्याने डबल इंजिन सरकारला बुलेट ट्रेनचा वेग – मुख्यमंत्री शिंदे (MAHARASHTRA POLITICS)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. देशाला आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता फक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठीच महायुती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला, त्यांच्या सोबत येण्याने डबल इंजिन सरकार यापुढे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल असा आशावाद यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत व्यक्त केला.

विकासाच्या अजेंड्यावर राष्ट्रवादी सोबत आल्याचा आनंद – उपमुख्यमंत्री फडणवीस Maharashtra Political Crisis

आमचे नेते, देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ! अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *