Ghewda Crop Insurance जीआय मानांकनप्राप्त घेवड्याला पीक विमा मिळावा: स्थानिक पाठपुराव्यानंतर भाजप युवा नेते अमित भोईटे यांचे थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन

कोरेगाव / सातारा:
Ghewda Crop Insurance उत्तर कोरेगाव परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे मुख्य आर्थिक आधार असलेल्या आणि भौगोलिक निर्देशांक (GI Tagging) मिळवलेल्या पारंपरिक घेवडा पिकाचा ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’त समावेश करावा, या मागणीने आता जोर धरला आहे. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार स्टेशन गणाच्या पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांच्या सूचनेनुसार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानंतर, आता भाजप युवा नेते अमित भोईटे यांनी थेट राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन घेवडा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, “घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश करण्यासाठी राज्य शासन लवकरच केंद्र सरकारकडे अधिकृत प्रस्ताव पाठवेल,” असे ठोस आश्वासन दिले आहे.
GI मानांकनप्राप्त पिकाला विम्याचे संरक्षण का गरजेचे?
उत्तर कोरेगाव परिसरासह सातारा जिल्ह्यातील सुमारे २० हजार शेतकरी दरवर्षी ३० हजार हेक्टर क्षेत्रावर घेवड्याचे उत्पादन घेतात. दिल्ली बाजारपेठेत जीआय मानांकन मिळवून या पिकाने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, अवेळी पाऊस आणि पिकाला विम्याचे संरक्षण नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडतात.
Ghewda Crop Insurance संरक्षण न मिळाल्यास अनेक शेतकरी घेवड्याऐवजी सोयाबीनसारख्या पर्यायी पिकांकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, निश्चित बाजारपेठ आणि शीतगृहांची (Cold Storage) कमतरता यामुळे हे नगदी पीक अडचणीत आले असल्याचे अमित भोईटे यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
स्थानिक निवेदनापासून ते थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा
यापूर्वी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित भोईटे व सहकाऱ्यांनी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. बी. मोकाळे यांना अधिकृत निवेदन देऊन स्थानिक पातळीवर या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्या पाठपुराव्याला आता यश येत असून, जिल्हा पातळीवरून सुरू झालेला हा लढा आता थेट राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचला आहे.
यावेळी कृषी मंत्र्यांनी टप्प्याटप्प्याने घेवडा पिकाला विशेष ब्रँड आणि दर्जा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. या प्रसंगी घेवडा उत्पादक शेतकरी किरण भोईटे, एबी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले, पत्रकार जलालभाई पठाण, पत्रकार अतुल वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.











