Pradhan Mantri Fasal Bima Yojana Marathi उत्तर कोरेगावच्या GI मानांकन प्राप्त घेवड्याला पीक विमा कवच द्या; पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांची मागणी

महाराष्ट्र वन न्यूज | वाठार स्टेशन (विशेष बातमी)
Pradhan Mantri Fasal Bima Yojana Marathi उत्तर कोरेगाव परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे मुख्य आर्थिक आधार असलेल्या पारंपारिक घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समाविष्ट करावा, अशी जोरदार मागणी वाठार स्टेशन गणाच्या पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी केली आहे. या संदर्भात सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. बी. मोकाळे यांना अधिकृत निवेदन देऊन घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे संरक्षण देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांच्यावतीने युवा नेते अमित भोईटे व कार्यकर्त्यांनी सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे सुपूर्द केले.
GI मानांकन प्राप्त पिकाला विम्याचे संरक्षण नाही
उत्तर कोरेगाव भागातील घेवड्याला विशेष गुणवत्तेमुळे भौगोलिक निर्देशांक म्हणजेच GI मानांकन प्राप्त झाले आहे. यामुळे या पिकाची राज्यभरात स्वतंत्र ओळख निर्माण झाली असली तरी, दुर्दैवाने या महत्त्वाच्या पारंपारिक पिकाचा समावेश अजूनही प्रधानमंत्री पीक विमा योजनेत करण्यात आलेला नाही. हवामानातील बदल, पावसाची अनिश्चितता आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
घेवडा उत्पादक शेतकरी सोयाबीनकडे वळण्याचा धोका
पिकाला विम्याचे संरक्षण उपलब्ध नसल्यामुळे नुकसान झाल्यास सर्व आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडतो. योग्य दर आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात संरक्षण मिळत नसल्याने अनेक शेतकरी घेवड्याऐवजी सोयाबीनसारख्या पर्यायी पिकांकडे वळू लागले आहेत. तरीसुद्धा उत्तर कोरेगाव परिसरात आजही मोठ्या प्रमाणावर घेवड्याची लागवड केली जाते. या पारंपरिक पिकाचे संवर्धन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी पीक विमा कवच देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
प्रशासनाने तातडीने सकारात्मक प्रस्ताव पाठवावा
आगामी हंगामापासून घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही आणि शिफारस करावी, अशी मागणी अनिता भोईटे यांनी केली आहे. शेकडो शेतकरी कुटुंबांचे जीवनमान या पिकावर अवलंबून असल्याने जिल्हा कृषी विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवावा, अशी अपेक्षा सर्व स्थानिक घेवडा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.












