Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026: माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी सातारा पोलीस सज्ज; २४ गुन्हेगार तडीपार, मोठा बंदोबस्त तैनात!

गणेश भंडलकर / लोणंद
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2026 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. माऊलींच्या पालखीचे येत्या १५ जुलै २०२६ रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होत असून, १५ ते १८ जुलै या कालावधीत हा संपूर्ण सोहळा अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांनी व्यापक आणि कडक सुरक्षा नियोजन केले आहे. पालखी सोहळ्यादरम्यान सातारा जिल्ह्यात लाखो वारकरी दाखल होणार असल्याने, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने आतापासूनच कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
वारीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर मोठा भर दिला आहे. या सोहळ्यात अडथळा निर्माण करू शकणाऱ्या तब्बल २४ सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी तडीपार केले असून, आणखी १६ जणांच्या तडीपारीचे कडक प्रस्ताव सध्या प्रशासनाच्या विचाराधीन आहेत. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या, पाकीटमारी तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष साध्या वेशातील डीबी पथके (DB Teams) २४ तास सज्ज राहणार आहेत.
या महासोहळ्याच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्ह्यातील ६३ अधिकारी, ७३९ पुरुष पोलीस अंमलदार, ९७ महिला पोलीस अंमलदार, ११०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड, ७५ वाहतूक पोलीस, दोन आरसीपी प्लाटून आणि एक बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तैनात करण्यात आले आहे. याशिवाय, इतर जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून, यामध्ये १८ अधिकारी, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी १४० पोलीस अंमलदार, रायगड जिल्ह्यातील १० अंमलदार, ३० अतिरिक्त वाहतूक पोलीस आणि एसआरपीएफची (SRPF) एक कंपनी बंदोबस्तात सामील होणार आहे.
या संपूर्ण कडक बंदोबस्ताचे नियोजन पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या थेट नियंत्रणात केले जात आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या व पाकीटमारी करणाऱ्यांवर, तसेच महिलांची छेडछाड किंवा गैरवर्तन करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच वारकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या बेदरकार वाहनचालकांवरही पोलीस कडक नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी नागरिक आणि भाविकांना आवाहन केले आहे की, कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा आणि हा पवित्र सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.









