शाळेच्या शिक्षकांचा विद्यार्थांनी केला कृतज्ञता सन्मान
विद्यार्थी रमले शाळेच्या आठवणीत केली धम्माल मस्ती
३३ वर्षांपूर्वी शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी आज संस्कारमूल्य जीवन जगत असून विविध क्षेत्रात आपली कार्यकर्तृत्व सिद्ध करीत आहेत अशावेळी आपल्या शाळेसाठी भरीव कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या भावनेतून तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत किन्हई (ता . कोरेगाव ) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या १९९२ -९३ सालच्या दहावीच्या बॅचचा विद्यार्थांनी तब्बल ३३ वर्षांनी एकत्र येत स्नेहमेळावा आयोजित केला व शाळेच्या आठवणींना उजाळा देत मित्राची शाळा पुन्हा भरवली.
किन्हई ( ता . कोरेगाव ) येथील साखरगड मंगल कार्यालयात या बॅचच्या स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी तत्कालीन मुख्याधापक संपतराव जगदाळे सर , शिक्षक काटे सर , चंद्रकांत तावरे सर , पवार सर, काटे मॅडम, बुर्ले मॅडम व शिक्षक उपस्थित होते . यावेळी १ ९ ९ २ -९ ३ च्या सुमारे ५ ० हुन अधिक माजी विद्यार्थांनी या मेळाव्याला हजेरी लावत शोभा आणली . सर्व विद्यार्थांनी शिक्षक गुरुजनांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता सन्मान केला .
यावेळी काटे सर म्हणाले, तब्बल तीन दशकाचा काळ लोटल्यावरही आज या विद्यार्थांनी एकत्र येऊन आमचा सन्मान केला याचा आनंद खूप मोठा आहे, आपली शिकवलेली मुले मोठी झाली, क्षितीज संपादन करूनही जमिनीवर सिद्ध उभी आहेत याचा शिक्षक म्हणून निश्चित अभिमान वाटतो, आजच्या सोहळ्यामुळे पुन्हा भूतकाळात रममाण होता आले त्यासाठी या लेकरांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. यानिमित्ताने एकमेकांच्या सुख दुःखात खंबीर उभे रहा आणि हा तुम्ही जोडलेला मैत्रीचा धागा जपत राहा.
यावेळी मुख्याधापक संपतराव जगदाळे सर म्हणाले, किन्हई गावाने मला भरपूर दिली तुमच्या रूपाने भला मोठा परिवार आयुष्यात मिळाला. हायस्कुलने जी गुणवत्तेची परंपरा राखली तीच घेऊन तुम्ही जीवनात यशस्वी होत आहेत हे पाहून भारावून येते, मुलांनी ३० वर्षांनी जे प्रेम दिले ते अमूल्य आहे आणि आमच्या कार्याची शिदोरी आहे

ऋणानुबंधाच्या गाठीभेटीनी दिवस संस्मरणीय
यावेळी एकत्र आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अर्थात मित्र, मैत्रिणी एकमेकाला पाहून भारावून गेले आणि जुन्या आठवणी एकमेकांशी सांगू लागले. मित्र आणि मित्रत्व जपणारी ही पिढी येणाऱ्या पिढीसाठी आदर्शवादी आहे. या स्नेहसंमेलनात एकमेकांशी सुसंवाद साधून, करमणूक, स्नेहभोजन, एकमेकाची सुख दुःख अतिशय तळमळीने सांगत होते .आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी ज्या शाळेने आपल्याला हे संस्कार दिले त्या शाळेसाठी आपले योगदान असणे गरजेचे आहे लवकरच पुढील असाच आनंददायी, प्रेरणादायी स्नेहसंमेलन व्हावा अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली हे मैत्रीचं नातं आणि शाळे बद्दलची ओढ कायम दृढ व्हावे हेच संमेलनातून सिद्ध झाले आणि हे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. दरवर्षी पुन्हा नव्याने भेटायचे या संकल्पाने या सोहळ्याची सांगता झाली.
याप्रसंगी कैलास गुरव, सुधीर जाधव, आशा गुरव, सुधीर कुंभार, विजय कदम, वंदना भोसले, सुरज धनवडे, अमर साळुंखे व मित्र मैत्रिणी यांनी मनोगते व्यक्त केली. स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी बॅच मधील सर्व माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक वैशाली भोसले व स्वागत संग्राम भोसले यांनी केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक प्रकाश राजे केले तर उपस्थित सर्वांचे हणमंत काशीद यांनी आभार मानले.
