२५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग
अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पॅनल १३-० ने विजयी
मुंबई: पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईत कार्यरत असेलेल्या माथाडी कामगारांची अर्थवाहिनी असलेल्या मुंबईतील सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरुषोत्तम माने यांची २५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री परिवार पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला आहे. यानिमित्ताने सह्याद्री परिवार पॅनलने सह्याद्री बँकेचा गड जिंकून परिवर्तनाची नांदी केली.
सह्याद्री मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. श्री चव्हाण यांच्या नेतृत्वातील सह्याद्री परिवार पॅनेलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये सह्याद्री परिवार पॅनलचे पांडुरंग गोसावी, मोमीन शौकत, संपत रास्ते, मोहिनी देशमुख, संजीवनी जाधव, रामदास चव्हाण, संतोष धुमाळ, वसंत घाडगे, गोरख महाडिक, हेमंत निंबाळकर, अशोक फाळके, अरविंद साळुखे, विजय शेलार आदी उमेदवार विजयी झाले.

या विजयाबद्दल अमित चव्हाण व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्रीकांतजी भारतीय ,बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार योगेश सागर, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
सह्याद्रीनगरात जल्लोष आणि गुलाल
सह्याद्री बँकेच्या निकाल हाती येताच माथाडी कामगारांचे केंद्र असलेल्या मुंबईतील सह्याद्रीनगरात सह्याद्री परिवाराच्या कार्यकर्त्यांनी पॅनलचे प्रवर्तक अमित चव्हाण व नूतन संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी सभासद कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. भव्य आभार रॅली काढून सभासदांना धन्यवाद दिले.