अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न
अंबवडे संमत कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शंभराव्या वाढदिवसाला या शाळेचे शंभरी पार केलेले पहिले विद्यार्थी उपस्थित होते. वय वर्षे १०५ पार केलेले शाळेचे पहिले विद्यार्थी पैलवान बाबुराव मल्हारी नेटके (वय १०५ वर्षे) यांच्या हस्ते केक कापुन अंबवडे संमत कोरेगाव शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळा अनोख्या पद्धतीने दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी आजी माजी विद्यार्थी यांच्या शाळेच्या आठवणींनी आणि उपस्थितीने शताब्दी महोत्सव गोड झाला.
अंबवडे संमत कोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, माजी जलसंपदा मंत्री आमदार शशिकांत शिंदे, व्याख्याते प्रदीप कांबळे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षण अधिकारी वनिता मोरे शिक्षण विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर, सीमा बर्गे, संगीता नलावडे, केंद्रप्रमुख दिनकर शिंगटे, सरपंच बाबासाहेब जाधव, शाळाप्रमुख छाया कुरकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी माजी मुख्याधापक नारायण मोरे गुरुजी हे होते.

यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, अंबवडे गावाची मराठी शाळा शंभरी पार करतेय हि बाब कौतुकास्पद आहे. गावाने पक्षीय विचार बाजूला ठेवून एकजूट होत हा सोहळा आयोजित केला याचा आनंद आहे. गावाच्या जडणघडणीत या शाळेने मोलाचे योगदान दिलेलं आहे. आज अनेक शाळेने हजारो विद्यार्थी घडवले ज्यांनी आपल्या कार्याचे झेंडे रोवले. त्याकाळात शाळेला इमारती नव्हत्या, खोल्या नव्हत्या, शाळा देवळात भरायच्या तरीही दर्जेदार शिक्षण व संस्कार मिळायचे. आता जबाबदारी आपली आहे, शाळा टिकली पाहिजे आणि जपली पाहिजे यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूयात. शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी देऊन नऊ खोल्या बांधण्याचे आश्वासन यावेळी आमदार महेश शिंदे यांनी दिले.
याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, मराठी शाळॆचे शतक महोत्सव असताना सर्व गाव एकविचाराने सारे पक्षीय भेद बाजूला सारून मेहनत घेत आहे. या शाळेला यशाची वेगळी परंपरा आहे ज्यामुळे अनेक विद्यार्थी घडले ज्यांनी देशाच्या राज्याच्या शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रात नेतृत्व केले त्यांच्या शाळेविषयीच्या आपलेपणामुळे हा महोत्सव होतोय. आज इंग्रजी माध्यमांचे आव्हान आपल्यापुढे आहे, अशावेळी पट टिकवून शाळा वाढवणे हे काम अंबवडे ग्रामस्थ नक्कीच करतील. या शाळेला ९ खोल्या मिळणार आहेत असे समजले आनंदाची बाब आहे आता फक्त नवीन जागेत शाळा बांधा त्यासाठी नवीन जागा खरेदी करा, भविष्यात ए आय टेक्नॉलॉजी युक्त सुविधा असणारी तालुक्यातील पहिली शाळा उभी करण्यासाठी जी मदत लागेल ती देऊ यासाठी आजपासून कामाला लागा असे आवाहन केले.
यावेळी माजी विदयार्थी सनदी अधिकारी शिवकुमार साळुंखे, चंद्रकांत चव्हाण, आदेश चव्हाण, डॉ. बिपीन येवले, अंकिता साळुंखे, आनंदा मोरे, अमृता फाळके यांनी मनोगते व्यक्त केली
यावेळी शाळेच्या आजी माजी शिक्षकांचा शताब्दी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शाळेच्या दानशूर माजी विद्यर्थ्यांच्याही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका छाया कुरकुटे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका वसुधा पंडित यांनी स्वागत केले. यावेळी गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळाचे कार्यकर्ते, आजी माजी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी १९९२-९८ च्या बॅचने परिश्रम घेतले.
पत्रकार प्रकाश राजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिक्षक हणमंत बागाव यांनी सर्वांचे आभार मानले
