Headlines

कोरेगाव तालुक्यातील २६ गावांना वसनेचे पाणी मिळणार

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वेक्षणाचे आदेश

मंत्रालयातील बैठकीत निर्णय

कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागाच्या पाणी प्रश्नासंदर्भात आज मंत्रालयात बैठक संपन्न झाली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  दालनात झालेल्या या बैठकीत वसना जलसिंचन उपसा योजनेतून वगळलेल्या गावांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याबाबत विस्ताराने चर्चा झाली. प्रत्येक गावातील पाझर तलावात पाणी पोचवण्यासाठी पाईपलाईनचा सर्वे करण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.  माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून या भागाचा रखडलेला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वसना योजनेत वगळलेली गावे समाविष्ट करणे तसेच सर्व २६ गावापर्यंत पाईपलाईन करुन वसना योजनेचे पाणी पोचवण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, अमित चव्हाण, मनोज अनपट, दत्तात्रय धुमाळ, अविनाश फडतरे, योगेश कर्पे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वसना योजनेसाठी सुरवातीला 0.92 टीएमसी आणि गेल्या वर्षी 0.52 टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र तरीही हे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने कोरेगावच्या उत्तर भागाला मिळत नाही. नदीच्या पश्चिमेकडील गावे काही प्रमाणात ओलिताखाली येत असली तरी सोळशी, पिंपोडे बुद्रुक आणि वाठार स्टेशन परिसर अद्याप तहानलेला आहे. कितीही पाऊस पडला तरी उन्हाळ्यात पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर येते. तसेच उन्हाळ्यात टँकरवर शासनाला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. त्यासाठी वसना योजनेतील त्रुटी दुरुस्त करुन २६ गावांपर्यंत पाईप करणे आणि प्रत्येक गावातील तलावात पाणी पोचवणे गरजेचे आहे. तसेच वसना योजनेचे मंजूर पाणी पूर्ण क्षमतेने नांदवळ धरणात सोडावे लागेल, असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर प्रास्ताविक सोळशी धरणातील पाणी आणि वसना योजनेचे १.४४ टीएमसी पाईपलाईनद्वारे नांदवळ धरणासह २६ गावांमधील पाझर तलावात पोचवण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. यावेळी दीपक पिसाळ, सुर्यकांत निकम, इंद्रसेन सोळसकर, आकाश सोळसकर, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र धुमाळ, शेखर काटकर व उत्तर कोरेगावमधील महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविक सोळशी धरणाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार प्रयत्नशील आहे. ते पाणी धोम धरणात सोडून पुढे जिल्ह्यातील दुष्काळी भागात पोचवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. लवकरच उत्तर कोरेगावला त्यांच्या हक्काचे पाणी बारमाही मिळेल. विरोधकांनी इतकी वर्षे दुष्काळी जनतेची केवळ फसवणूक केली आहे. — माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.  

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *