देऊर येथील श्री मुधाई देवी शिक्षण संस्थेत स्व . यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
राष्ट्ररुपी हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्ररुपी सह्याद्री निधड्या छातीने धावून जातो हे स्व. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले तोच विचार घेऊन आज सातारा जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणावर सैन्यात सेवा देण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्यादी धावून जातो हा इतिहास पुन्हा पुन्हा अधोरेखित होतो आणि होत राहिल असे प्रतिपादन तरुणभारतचे पत्रकार प्रकाश राजे यांनी केले.
देऊर येथील श्री मुधाई देवी शिक्षण या आमच्या मातृसंस्थेत महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी संस्थेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र कदम, प्राचार्य प्रदीप ढाणे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख, माजी सैनिक रफिक इनामदार, सुरेश निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलताना प्रकाश राजे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांचा यशवंत विचार घेऊन देऊरची श्री मुधाईदेवी शिक्षण संस्था कार्यरत आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण संधी मिळून स्व . यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची समाज निर्मिती होण्यास मदत होईल. अभिषेक पवार यांच्यासारखी कष्टकऱ्यांची मुले आज सैन्यदलात अधिकारी होत आहेत हे त्याचेच प्रतीक असून सरंक्षणमंत्री राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यासाठी हि बाब भूषणावह आहे. यावेळी देऊरचे सुपुत्र भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झालेल्या अभिषेक दत्तात्रय पवार यांचा सन्मान श्री मुधाईदेवी शिक्षण संकुलाच्या वतीने करण्यात आला. प्रा . नंदकुमार शेडगे यांनी ‘यशवंतराव- एक दृष्टा नेता’ या विषयावर मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवेंद्र कदम, प्राचार्य प्रदीप ढाणे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख, माजी सैनिक रफिक इनामदार, सुरेश निंबाळकर व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. आभार पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी मानले.
