बेंदूर
Bendur शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण, जाणून घ्या माहिती बेंदूर सणाची
देवशयनी आषाढी एकादशी झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सण-उत्सव, सुरु होतात. हे धार्मिक, सांस्कृतिक आणि निसर्गानुरुप असलेल्या सण-उत्सव मानवी जीवनात उत्सवाचे वातावरण निर्माण करतात आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये अशा सण व उत्सवांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये निसर्ग, त्यातील गोष्टींची कृतज्ञता अशा प्रकारच्या सण आणि उत्सवातून साजरी केली जाते. अशा या सणामधील आषाढी एकादशीनंतर येणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण सण म्हणजे बैलपोळा किंवा महाराष्ट्रीय बेंदूर. Bendur
आज ९ जुलै २०२५. आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्राणप्रिय सण महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून कृषीसंस्कृती हा महाराष्ट्राचा प्राण आहे. कृषीसंस्कृती म्हटले की, शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी येतात. यापैकीच आपल्या मातीतील एक सण म्हणजे बेंदूर. प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत आणि दिवस बदलत असल्याचे दिसून येते.
बेंदूर/ पोळा Bendur हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणारा सण महाराष्ट्रात तीन वेगवेगळ्या तिथींना साजरा होतो. जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतात. यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करतात. महाराष्ट्रातील बहुतांश भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दिवशी किंवा अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो. साधारणता विदर्भात बैलपोळा साजरा होतो.
बेंदूर Bendur सण हा वेगवेगळ्या तिथींना साजरा करण्याचे कारण बेंदूर पावसाळ्यात साजरा होतो. उन्हाळा संपत आला की शेतीची मशागतीची कामे पूर्ण होतात. पावसाळा सुरू झाला की शेतातील पेरणी व लावणीची कामे सुरू होतात. मुसळधार पावसाला जशी सुरुवात होते, तशी शेतातील बहुतांश कामे पूर्ण झालेली असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यातून थोडी उसंत मिळालेली असते, याच दरम्यान शेतकरी आपल्या बैलांच्या प्रती त्यांच्या अविरत कष्टाची जाणीव ठेवून, बेंदूर सण साजरा करतात.
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पावसाला सुरुवात होत नाही. केरळ किनारपट्टीवरून आलेला पाऊस आधी पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतो, यानंतर तो पुढे मध्य महाराष्ट्रात सरकतो, आणि तसाच तो पुढे विदर्भात जातो. पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो. यामुळे त्या त्या भागातील शेतीची कामे त्या अनुषंगाने पूर्ण होतात. या भौगोलिक कारणामुळे कदाचित तीन वेगवेगळ्या तिथींना महाराष्ट्रातील बेंदूर/ पोळा सण साजरा करतात. या सणांची नावे आणि साजरी करण्याची तिथी जरी वेगळी असली, तरी बेंदूर सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील भावना एकच आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आधुनिकतेमुळे आज खूप बदल झाले असले, तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही पारंपारिक साधने शेतीसाठी वापरली जातात. पुरातन काळापासून शेतीच्या बहुतांश कामांमध्ये शेतकरी बैलांचा वापर करतात. वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी शेतात राबतात. शेतकरीही आपल्या बैलांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतात, प्रेमाने त्यांचा सांभाळ करतात. बैलांच्या या अपार कष्टाची जाणीव ठेवून शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, शेतकरी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करतात. बेंदूर सणांला बैल पोळा सण असेही म्हणतात.
बेंदूर Bendur सणाच्या साधारण चार दिवस आधी मातीचे तयार केलेले बैल घेऊन गावचे कुंभार गावोगावी तसेच शहरातही फिरतात. बहुतांश घरांमध्ये मातीच्या बैलांची जोडी विकत घेतात. हल्ली काही ठिकाणी या मातीच्या बैलांना छान रंग देऊन सजवतात. बेंदराच्या आदल्या दिवशी या बैलजोडीची श्रद्धेने पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात.
बेंदराच्या आदल्या दिवशी, शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची खांदे मळणी करतात. यामध्ये शेतकरी आपल्या बैलांच्या खांद्यांची तेल लावून मालिश करतात. यानंतर त्यांना गरम पाण्याने अंघोळ घालतात. खांदेमळणी करताना बैलांचे खांदे गरम पाण्याने धुवून ते गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लेप लावून त्यांना खिचडा खायला घालतात. या खिचड्यामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारची धान्य किंवा डाळी, आधी भिजवतात आणि मग शिजवतात. वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी त्यांच्या खांद्यावर ओझे घेऊन शेतीत राबतात, म्हणूनच त्यांची खांदेमळणी केली जाते.
बेंदूर Bendur सणाच्या दिवशी सकाळी दरवाजांना तोरण बांधतात. हे तोरण सुंबाच्या दोरीत पिंपळाची पाने ओऊन बनवतात. बेंदरादिवशी सकाळी घरातील सर्व जनावरांना व्यवस्थित धुवून आंघोळ घालतात. जनावरांचे गोटेही स्वच्छ झाडून, धुवून घेतात. बैलांना आंघोळ घालुन, घरी आल्यानंतर त्यांना सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग देतात. शिंगांच्या टोकांना छान तुरे लावतात तसेच त्यांच्या शिंगांमध्ये डाळीचे पीठ व गुळ यांपासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. गळ्यात घुंगराची माळ घालतात. डोक्याला बाशिंग बांधतात. बैलांच्या अंगावर वेगवेगळे रंगीबिरंगी छाप उठवतात. त्यांच्या अंगावर छान झूल घालतात.
यादिवशी नवीन वेसण, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बैलांच्या पायांमध्ये दोऱ्यापासून विणलेले तोडे घालतात. त्यांना नवीन वेसन व कासरा घालतात. घरातील स्त्रिया पारंपारिक वेशात तयार होतात. घरात पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी करंज्या व चकल्या पण बनवतात. यानंतर घरातील सर्वजण मिळून बैलांची पूजा करतात, त्यांचे औक्षण करतात व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य आणि छान हिरवा चारा दिला जातो.
बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना दिवसभर विश्रांती दिली जाते. घरातील महिला रांगोळीने घर सजवतात. शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची या दिवशी प्रेमाने काळजी घेऊन बैलांची सेवा करतात. त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल-ताशांच्या सवाद्य गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. त्यांना हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हीच पुरणपोळीनंतर बैलांना खायला दिली जाते.
दुपारनंतर बैलांना मिरवणुकीसाठी तयार केले जाते. यानंतर गावातील सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. गावातील अबालवृद्ध, मुले-मुली, स्त्रिया पारंपारिक वेशात, या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होतात. गावच्या वेशीपर्यंत या मिरवणुका काढल्या जातात. बेंदरादिवशी कर ओलांडायची प्रथा आहे. यामध्ये गावातल्या काही प्रतिष्ठित मानकरी लोकांच्या बैलांकडून गावच्या वेशीवर बांधलेली कर ओलांडली जाते. गाव वेशीवर चालणारा हा एक पारंपारिक सोहळा आहे. काही गावांमध्ये बैलजोडींच्या सजावटीची स्पर्धा आयोजित केली जाते. यावेळी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडीला बक्षीस दिले जाते. मिरवणुकीवरून घरी आल्यानंतर, घरच्या स्त्रिया आपल्या लाडक्या बैलजोडीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून त्यांचे औक्षण करूनच त्यांना घरात घेतात आणि त्यांची दृष्ट काढली जाते.
माणसाने आज कितीही प्रगती केली तरी, अखंड मानव जातीसाठी लागणारी अन्नधान्याची गरज, पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबावे लागते. शेतकरी पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचा योग्य मिलाफ करत शेतात कष्ट करून अन्नधान्य पिकवतात. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची बैलजोड म्हणजे जणू पोटची पोरंच असतात. आपल्या मालकासाठी ही बैलजोड शेतात ईमानाने राबते, आणि याच ईमानाची जाणीव ठेवून बैलपोळा किंवा बेंदूर हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
अशा या बैलपोळा किंवा महाराष्ट्रीय बेंदूर या सणाच्या निमित्ताने आपण आपल्या घरातीलच नव्हे तर समाजातील सर्व प्राणी मात्रांच्यावर दया दाखवून त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. कारण हे प्राणी समाजाचा तर एक घटक असतातच. त्याशिवाय आपल्यासाठी ते राबत असतात आपल्याला दुधदुभते तसेच आणखी काही बाबतीत मदत करत असतात. या बैलपोळा किंवा महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या निमित्ताने शेतकरी मित्र बैल आणि मानवजातीसाठी राबणाऱ्या सकल प्राणीमात्रांना अभिवादन..... 
लेखन – सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर (लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव, गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
९९७५७५९३२५
