Satara News वाघोली पुलाच्या काम संथ गतीने..आमदार सचिन पाटील ऍक्शन मोडमध्ये

Satara News पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी, दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या सूचना
रणजित लेंभे/ सातारा
Satara News वाघोली (ता. कोरेगाव) येथील वसना नदीवरील नवीन पुलाच्या कामाची आमदार सचिन पाटील यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. जुना पूल कोसळल्यानंतर नवीन पुलाचे काम सुरू असून, मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. याबाबतच्या तक्रारी नंतर आमदार सचिन पाटील ऍक्शन मोडमध्ये आले असून पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करीत कोणत्याही परिस्थितीत दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार व अधिकारी यांना दिल्या आहेत.
गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामामुळे दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला असून, नदीपात्रातून मातीचा भराव टाकून तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मार्गावरून जाताना दुचाकी वाहने घसरून वारंवार अपघात होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार सचिन पाटील यांनी आज दुपारी पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पाच मेपासून सुरू असलेल्या या कामात आतापर्यंत पुलाचे दोन्ही बाजूंचे पिलर उभारण्यात आले आहेत. यावेळी आमदार पाटील यांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिले.
नदीपात्रातून तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर आणखी भराव टाकून रस्त्याची खोली कमी करावी, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशा सूचना देखील आमदार पाटील यांनी दिल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पिसाळ, शहाजी भोईटे, राजेंद्र धुमाळ, अमोल निकम, सागर लेंभे, परमेश्वर गार्डी, संभाजी निकम यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. Satara News





