BIG NEWS कोरेगावात तलाठ्याची पत्रकारास मारहाण, पत्रकार संघटना आक्रमक

BIG NEWS – पत्रकार नवनाथ पवार यांच्यावरील हल्ल्याविरोधात पत्रकार संघटना आक्रमक, तीव्र निषेध,
BIG NEWS -तलाठ्यावर कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर,
BIG NEWS :कोरेगावात तलाठ्याची पत्रकारास मारहाण कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना ग्राम महसूल अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या प्रशांत पवार याने शुक्रवारी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास तु मटक्याची बातमी का लावली, अशी विचारणा करत मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तो जुजबी आहे. पत्रकार संरक्षण कायद्याखाली हा गुन्हा दाखल करावा आणि प्रशांत पवार याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेचा पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.
नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत शुक्रवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पवार याच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रशांत पवार याचा मित्र म्हणवत असलेल्या निवास मेरुकर याने देखील शुक्रवारी रात्री मोबाईल वरून सातत्याने कॉल करून नवनाथ पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात नव्याने अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, महाराष्ट्र डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी, कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे, उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश राजे अशा विविध पत्रकार संघटना यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यातील पत्रकार पांडुरंग बर्गे, सोमनाथ शिंदे, प्रकाश राजे, संदीप पवार, साहिल शहा, राजेंद्र तरडेकर, अजमुद्दिन मुल्ला, दादा वाकडे, देवानंद जमादार, अधिक बर्गे, संभाजी भोसले, सुनील पाटे यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात एकत्रित येऊन घडल्या प्रकाराबाबत निषेध केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
पत्रकार नवनाथ पवार यांनी घडल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व उपस्थित पत्रकारांना दिली. कोरेगाव तालुक्यातील अवैद्य व्यवसाय तात्काळ बंद करावेत, पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी आणि भविष्यकाळात पत्रकारांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. ग्राम महसूल अधिकारी प्रशांत पवार याला तात्काळ अटक करावी, अशी आग्रही मागणी पत्रकारांनी केली. त्यावर पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी आपण आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, सरकारी वकिलांकडून अभिप्राय घेऊन याबाबत गुन्हा दाखल केला जाईल अथवा दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कलमे वाढवली जातील, अशी ग्वाही दिली.
याप्रकरणी लवकरच जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांची भेट घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटणार असल्याचे सांगितले.





