समर्थ नगरी वाठार स्टेशनला आजपासून हरिनामाचा जागर samarth Wagdev maharaj

समर्थ नगरी वाठार स्टेशनला आजपासून हरिनामाचा जागर samarth Wagdev maharaj

ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ samarth Wagdev maharaj

२ जानेवारीला श्री समर्थ वाग्देव महाराजांचा रथोत्सव

श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ९० व्या पुण्यतिथीनिमित्त वाठार स्टेशन येथे उद्यापासून भव्य अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक वातावरणाने नटणारा हा सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
या पारायण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत आणि ख्यातनाम कीर्तनकारांची मांदियाळी वाठार स्टेशन येथे अनुभवायला मिळणार आहे. गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. अशोक महाराज इलग शास्त्री (बोधेगाव, नगर) यांच्या कीर्तनसेवेने सोहळ्याची सुरुवात होणार आहे.
शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी ह.भ.प. विश्वास आप्पा कोळेकर (नांदल, फलटण), शनिवार, दिनांक २७ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर, रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील, सोमवार, दिनांक २९ डिसेंबर रोजी रामायणाचार्य ह.भ.प. पारस महाराज मुथा (अहिल्यानगर), मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर, अहिल्यानगर) तर बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर रोजी ह.भ.प. ॲड. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
गुरुवार, दिनांक १ जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनासाठी ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे (नाशिक–मालेगाव) उपस्थित राहणार आहेत.

या अध्यात्मिक सोहळ्याचा कळस म्हणून शुक्रवार, दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या रथाची संपूर्ण वाठार स्टेशन नगरीतून भक्तीमय प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे.
या रथोत्सवाला प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राज्यसभा खासदार नितीन काका पाटील, माजी खासदार रणजीत दादा नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार गोपिचंद पडळकर, आमदार उत्तम जानकर, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मार्तंड संस्थान जेजुरीचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, गणेश वळकुंदे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अमित चव्हाण, प्रवीण अहिरेकर, वाठार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, तसेच वाठार स्टेशनच्या सरपंच सौ. सीमा चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे.

दरम्यान, देवस्थानचे अध्यक्ष निवृत्ती भाऊ करे यांनी भाविक भक्तांना आवाहन केले आहे की, “श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तनसेवा व रथोत्सवाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा. हा सोहळा भक्ती, संस्कार आणि अध्यात्मिक जागृतीचा महत्त्वाचा पर्व असून, सर्वांनी कुटुंबासह उपस्थित राहावे,” असे त्यांनी सांगितले.

या पारायण व रथोत्सवामुळे संपूर्ण वाठार स्टेशन नगरी भक्तीमय आणि अध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यास उपस्थित राहत आहेत.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)