‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने……
महाराष्ट्रातील जनतेच्या अथक कष्ट, प्रयत्न व संघर्ष आणि १०८ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई ही राज्याची राजधानी बनली. महाराष्ट्रात मराठी बोलणारे खूप लोक असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही कालावधी जावा लागला. बरेचसे साहित्यिक, पत्रकार, क्रांतिकारक यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे मराठी भाषेला अखेर राजभाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेबद्दल अनेक संत, साहित्यिकांनी गौरवास्पद लिहून ठेवलेले आहे. मातृभाषेची तुलना अमृताशी करताना संत ज्ञानेश्वरांनी यांनी ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके’ असे म्हटले आहे.
आज मराठी भाषा महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते. जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठी साहित्यातील अनेक दिग्गज कवी, लेखक यांनी मराठीत उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. असेच एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर. मराठी ही राजभाषा, ज्ञानभाषा व्हावी यांसाठी केलेल्या संघर्षामध्ये कुसुमाग्रज नेहमीच अग्रेसर होते. देशपातळीवर मराठी भाषेचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी खूप काम केले होते. त्यांनी केलेल्या संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘२७ फेब्रुवारी’ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. २१ जानेवारी २०१३ मध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाबरोबरच मराठी राजभाषा दिवस आणि २१ फेब्रुवारीला ‘जागतिक मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.
या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेविषयी आपण काही गोष्टी जाणून घेऊया. मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झालेला आहे. या भाषेची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवीसन बाराशे अष्टोत्तर मध्ये म्हाईमभट यांनी लिळाचरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संताच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखनींची समृध्दी आणि संपन्नता लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे संरक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारताव्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी-व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते. मराठी भारतातल्या अधिकृत २२ भाषांपैकी एक असून जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही १५ वी भाषा आहे. तर भारतातली तिसरी भाषा आहे. याबरोबरच महाराष्ट्र आणि गोव्याची मराठी ही अधिकृत भाषा आहे. मराठी भाषेला दीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे. हा वारसा आणि परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या तरुणीवर आहे.
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने वि.वा.शिरवाडकर यांच्या मराठी साहित्यातील कार्यास अभिवादन करूया. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या बोली भाषेला एक वेगळा साहित्य प्रकार म्हणून प्रस्थापित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी मराठी ही शिकण्याची भाषा व्हावी यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
आज ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचे, संस्कृती आणि साहित्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही दिले जातात. मराठी भाषेचे संवर्धन करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वकृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात.
आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचे असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्व टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणार्या पिढील मराठी साहित्याची ओळख करुन दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकरांनी आपल्या भाषेत दिलेले ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल. त्यामुळे आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृध्द करण्यासाठी तसेच जोपसण्यासाठी प्रयत्न करावेत.
विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज हे महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठी भाषेतील अग्रगण्य आणि चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, थोर लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे करतात.
कुसुमाग्रजांनी अक्षरबाग, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज, जीवन लहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन, मेघदूत, रसयात्रा, वादळ वेल, विशाखा, श्रावण, समिधा, स्वगत, हिमरेषा असे एकाहून एक सरस कविता संग्रह लिहून आपल्यातील कवित्त्वाची साक्ष दिली. त्याचबरोबर आहे आणि नाही व प्रतिसाद हे दोन लघुनिबंध संग्रह ही लिहिले. त्यांची ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, कौंतेय, जेथे चंद्र उगवत नाही, दिवाणी दावा, दुसरा पेशवा, दूरचे दिवे, देवाचे घर, नटसम्राट, नाटक बसते आहे, बेकेट, महंत, मुख्यमंत्री, ययाति देवयानी, राजमुकुट, विदूषक, वीज म्हणाली धरतीला, वैजयंती अशी एकाहून एक गाजलेली नाटके मराठी रंगभूमीला देऊन एक अमरत्व बहाल करणारा रंगकर्मी ते बनले.
कविता आणि नाटकाबरोबरच त्यांनी कथाही लिहिल्या. अंतराळ, अपॉईंटमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, बारा निवडक कथा, सतारीचे बोल असे कथासंग्रह लिहून साहित्याच्या दरबारातील नवरत्न म्हणून ते प्रसिद्धीस पावले. कादंबरी या साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी अगदी झोकात पदार्पण करून मराठीतील जेष्ठ कादंबरीकार म्हणून मान्यता पावले. त्याच्या कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव, आठवणीपर, वाटेवरच्या सावल्या या कादंबऱ्यांनी मराठी भाषेत नवा उच्चांक प्राप्त केला.
वि.वा. शिरवाडकरांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार मिळाले त्यात ’मराठी माती’ला १९६० साली, ’स्वगत’ला १९६२ साली, ’हिमरेषा’ला १९६२ साली, ’नटसम्राट’ला १९७१ साली, ’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४), “ययाती आणि देवयानी” या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत “वीज म्हणाली धरतीला” या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या विशाखा या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार १९९१ साली त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला.त्यांच्या कारकीर्दीचा गौरव करताना भारत सरकारने अंतराळातील एका ताऱ्यास ‘कुसुमाग्रज’ हे नाव दिले गेले. सन १९७४ साली त्यांना ‘नटसम्राट’ नाटकाला ‘साहित्यसंघ’ पुरस्कार मिळाला. सन १९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डि.लिट्’ ही सन्माननीय पदवी प्रदान केली. सन १९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला. याबरोबरच वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान त्यांच्या साहित्यिक कार्याची प्रचीती देतात. मुंबई, मडगाव, कोल्हापूर येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा या महान साहित्यिकाला त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन……..
सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
(लेखक प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय,देऊर येथे सहाय्यक प्राध्यापक असून दुर्ग भेटी आणि पर्यटन यावर विविध वृत्तपत्रातून लेखन करतात.)
९९७५७५९३२५






